7th Pay Commission : गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात बदल होणार अशा काही चर्चा सुरू आहेत. प्रसारमाध्यमांमध्ये सुरू असणाऱ्या याच चर्चांवर संसदेत देखील सरकारला प्रश्न विचारण्यात आला होता. दरम्यान, या संदर्भात सरकारने संसदेत मोठी माहिती दिली आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढणार की नाही ? यासंदर्भात सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजेच राज्यसभेत सदस्य तेजवीर सिंह यांनी याबाबत प्रश्न विचारला होता.
त्यांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकार लवकर निवृत्तीसाठी काही योजना तयार करत आहे का ? त्याचे परिणाम काय होतील? असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना केंद्रीय कार्मिक राज्य मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही, असे म्हटले आहे.
ज्या कर्मचाऱ्यांना उशिरा निवृत्त व्हायचे आहे, त्यांच्यासाठी निवृत्तीचे वय वाढवण्याची काही योजना सरकारने आखली आहे का, असा सवालही खासदारांनी केला होता. तसेच सरकारचा असा काही प्लान असेल तर अशा योजनेच्या अटी काय असतील ? असेही खासदारांनी यावेळी विचारले.
यावर मंत्री महोदयांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी उशीरा निवृत्तीसाठी कोणतीही योजना किंवा प्रस्ताव तयार करण्यात आलेला नाही असे स्पष्ट केले. सेवानिवृत्तीच्या वयातील लवचिकतेच्या प्रश्नावर जितेंद्र सिंह म्हणाले की, या संदर्भात कोणतेही सर्वसमावेशक धोरण नाही.
परंतु, काही नियमांची पूर्तता करणारे कर्मचारी लवकर निवृत्ती घेऊ शकतात. हे नियम केंद्रीय नागरी सेवा (पेन्शन) नियम, 2021 आणि अखिल भारतीय सेवा (मृत्यू-सह-निवृत्ती लाभ) नियम, 1958 मध्ये दिलेले आहेत. या अंतर्गत कर्मचारी लवकर निवृत्तीचा पर्याय निवडू शकतात.
सरकारने लवकर निवृत्तीसाठी नियम केले असल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु, निवृत्तीच्या वयातील मोठे बदल अद्याप सरकारच्या अजेंड्यावर नाहीत. सरकार सध्या निवृत्तीच्या वयात लवचिकता आणण्याचा विचार करत नाही. तथापि, सध्याच्या नियमांनुसार लवकर निवृत्तीचा पर्याय उपलब्ध आहे.
लवकर निवृत्ती घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना काही नियमांची पूर्तता करावी लागते. लवकर निवृत्ती घेण्याची अनेक कारणे असू शकतात. प्रकृती अस्वास्थ्यामुळे, त्याच वेळी एखाद्याला आपल्या कुटुंबासाठी वेळ द्यायचा असेल किंवा काही लोक नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी लवकर निवृत्ती घेऊ शकतात.