8th Pay Commission : गेल्या काही महिन्यांपासून देशात आठवावेतन आयोगाच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चांना लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून अधिक हवा मिळाली. लोकसभा निवडणुकीचा काळ पाहता केंद्रातील सरकार यावर सकारात्मक निर्णय घेणार असेच वाटत होते. मात्र केंद्रातील सरकारने त्यावेळी आठवा वेतन आयोगाबाबत निर्णय घेतला नाही.
मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर सादर झालेल्या अर्थसंकल्पात आठवा वेतन आयोगाबाबत मोठी घोषणा होण्याची आशा व्यक्त करण्यात आली होती मात्र त्यावेळीही या संदर्भात सरकारने निर्णय घेतला नाही.
खरंतर वेतन आयोगाचा आतापर्यंतचा ट्रेंड पाहिला असता प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होत आला आहे. सध्याचा सातवा वेतन आयोग हा 2016 मध्ये लागू झाला आणि आठवा वेतन आयोग 2026 मध्ये लागू होणे अपेक्षित आहे.
सातवा वेतन आयोग लागू होण्याआधी दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 2014 मध्ये सातवा वेतन आयोगाची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर एक जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी सुरू झाली. यामुळे आता एक जानेवारी 2026 पासून नवीन आठवा वेतन आयोग लागू होईल असे म्हटले जात आहे.
देशातील एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक 8 व्या वेतन आयोगाच्या स्थापनेच्या प्रतीक्षेत आहेत. पगार आणि निवृत्ती वेतनवाढीबाबत केंद्र सरकारला अहवाल सादर करणाऱ्या आयोगाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
8वा वेतन आयोग जानेवारी 2026 पासून लागू होणार असून त्यापूर्वी आयोग आपला अहवाल सादर करणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार नेमका किती वाहणारी या संदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आठवा वेतन आयोग लागू झाल्यास किती पगार वाढणार?
मीडिया रिपोर्टनुसार 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात आठवा वेतन आयोग स्थापित करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आता आपण आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार नेमका कितीने वाढू शकतो याचा एक आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सातव्या वेतन आयोगाची गणिते पाहिल्यास लक्षात येईल की, त्याच्या अंमलबजावणीपूर्वी किमान मूळ वेतन फक्त ७ हजार रुपये होते. 7 व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 पर्यंत वाढविण्यात आला, त्यानंतर किमान मूळ वेतन 18 हजार रुपये झाले. म्हणजे पूर्वीचे मूळ वेतन 7 हजार रुपये 2.57 पटीने वाढवून 18 हजार रुपये करण्यात आले.
त्याचप्रमाणे, जर 8 व्या वेतन आयोगातील फिटमेंट फॅक्टर 2.86 केला तर किमान मूळ वेतन 18 हजार रुपयांवरून 51,480 रुपये होईल. याचा अर्थ पगार सुमारे 3 पट वाढू शकतो. 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पगाराप्रमाणे पेन्शनमध्येही लक्षणीय वाढ होणार आहे.
सध्या किमान पेन्शन 9 हजार रुपये आहे, जी 2.86 च्या फिटमेंट फॅक्टरनुसार 25,740 रुपये होईल. लक्षात ठेवा की ही गणना केवळ किमान मूळ वेतन आणि पेन्शनसाठी आहे. मूळ वेतनासोबतच कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचा म्हणजेच डीएचाही लाभ मिळेल आणि वास्तविक पगार यापेक्षा कितीतरी अधिक असेल.