तुमच्याकडे किती जमीन आहे याला आजकाल तितकेसे महत्व नसून तुमच्याकडे जी जमीन आहे त्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने नियोजन करतात व पिकांचे उत्पादन घेतात याला खूप महत्त्व असते. सध्या शेतीची संपूर्ण पद्धत बदलली असून मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर होत असल्यामुळे अगदी दोन एकर क्षेत्रामध्ये देखील पाच एकर क्षेत्रात येईल इतके उत्पादन शेतकरी घेतात व वेगवेगळ्या पीक पद्धतीमुळे हे सगळे शक्य झालेले आहे.
या मुद्द्याला धरून जर आपण यवतमाळ जिल्ह्यातील जवळा या आर्णी तालुक्यातील गावचे रहिवाशी असलेले गणेश राऊत या प्रयोगशील शेतकऱ्याचे उदाहरण घेतले तर त्यांनी त्यांच्या शेतामध्ये मिश्र शेतीचा प्रयोग राबवून तो यशस्वी केलेला आहे. त्यांचा हा मिश्र शेतीचा प्रयोग खूप अनोखा असून या पद्धतीची शेती कशा पद्धतीने शेतकऱ्यांना फायद्याची ठरू शकते याबाबतचे एक जिवंत आणि उत्तम उदाहरण त्यांनी उभे केलेले आहे.
गणेश राऊत यांनी साधली मिश्र शेतीतून प्रगती
याबाबत सविस्तर वृत्त असे की, यवतमाळ जिल्ह्यात असलेल्या आर्णी तालुक्यातील जवळा या गावचे शेतकरी गणेश अमृतराव राऊत यांच्या शेतामध्ये फळबागा आणि मिश्र शेतीचा अनोखा प्रयोग राबवला आणि तो यशस्वी देखील करून दाखवलेला आहे. याकडे एकूण सात एकर क्षेत्र असून यामध्ये त्यांनी पेरूची लागवड केलेली असून त्यातून उत्पादित झालेल्या पेरूची विक्री ते बांधावरूनच म्हणजे शेतातूनच करतात. त्याच्या शेतामध्ये 300 पेरूची झाडे आहेत.
पेरू सोबतच 300 झाडे सीताफळाची लावलेली असून यामध्ये दोन प्रकारच्या सिताफळाची लागवड त्यांनी केलेली आहे व या दोन्ही प्रकाराच्या उत्पादन मिळण्यामध्ये साधारणपणे 15 ते 20 दिवसांचा फरक होतो व त्यामुळे विक्रीची व्यवस्थापन करणे त्यांना सोपे जाते. सीताफळ शिवाय 250 झाडे आंब्यांची लावलेली आहेत व त्यासोबत 40 झाडे चीकुची असून फणस, केळी तसेच ऊस, बोर, अंजीर तसेच जांभूळ, आवळा, लिंबू, रामफळ आणि पपई सारख्या फळबागांची देखील त्यांनी लागवड केलेली असून या माध्यमातून जे क्षेत्र उरते त्यामध्ये मिश्र पिके घेतात.
या सगळ्या फळबागांमध्ये ते आंतरपीक म्हणून तूर, सोयाबीन, कापूस यांचे एकत्रित लागवड करून एक वेगळाच प्रयोग त्यांनी या वर्षी केलेला आहे. एवढेच नाही तर या सगळ्या शेतीसाठी आवश्यक असलेल्या गांडूळ खताची निर्मिती देखील ते स्वतः करतात. या सगळ्या पिकांच्या माध्यमातून त्यांना वार्षिक सहा लाख रुपयांचा नफा मिळतो. या सगळ्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती पद्धतीची दखल घेऊन शासनाने एक जुलै रोजी कृषी दिनाच्या निमित्ताने कृषी विभागाच्या वतीने यवतमाळ या ठिकाणी त्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार देखील करण्यात आला.