Agriculrure News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे. खरे तर गेल्या वर्षी अर्थातच 2023 मध्ये सोयाबीन आणि कापूस पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. दुसरीकडे बाजारातही कापसाला आणि सोयाबीनला अपेक्षित भाव मिळाला नाही. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि शेतकरी कर्जबाजारी झालेत.
म्हणून गतवर्षी उत्पादित झालेल्या कापूस आणि सोयाबीन पिकासाठी अनुदानाची मागणी केली जात होती. याच मागणीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारने कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत हेक्टरी पाच हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे.
यासाठी शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून ४ हजार १९४ कोटी रुपयांच्या निधीला मंजूर करण्यात आला आहे. पण, अनुदानासाठी निधी मंजूर करण्यात आला असला तरी देखील अजून शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली नाही. राज्यात सोयाबीन, कापूस खातेदारांची संख्या आहे ९६ लाख १७ हजार एवढी आहे.
महत्त्वाचे म्हणजे आतापर्यंत यापैकी ७५ लाख ३१ हजार शेतकऱ्यांकडून संमती पत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र कृषी विभागाला सुपूर्द करण्यात आली आहेत. महाआयटीनं तयार केलेल्या पोर्टलवर यापैकी ६४ लाख ८७ हजार शेतकऱ्यांची माहिती कृषी विभागाकडून भरण्यात आली असल्याची माहिती कृषी विभागाकडून समोर आली आहे आहे.
मात्र कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेले अनुदान नेमके शेतकऱ्यांच्या खात्यात कधीपर्यंत जमा होणार हा मोठा यक्षप्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान आता याच संदर्भात राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मोठी माहिती दिली आहे.
कृषिमंत्री मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिले जाणारे हे अनुदान स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. हे अनुदान 26 सप्टेंबर 2024 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार अशी माहिती देण्यात आली आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत मुंडे यांनी याच संदर्भात एक महत्त्वाची आढावा बैठक घेतली.
या आढावा बैठकीत मुंडे यांनी कृषी विभागाला अतिशय महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. या महत्त्वाच्या बैठकीनंतर धनंजय मुंडे यांनी या अनुदानासंदर्भात बोलताना हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात कधीपर्यंत जमा होणार याची माहिती दिली. मुंडे यांनी म्हटल्याप्रमाणे, मोदी यांचा दौरा एक दोन दिवस मागे पुढे होऊ शकतो.
पण, हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा २६ सप्टेंबरला वाशिम दौरा आयोजित आहे. दरम्यान, याच दिवशी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा अनुदानाचा पैसा दिला जाणार आहे. त्यामुळं कृषी विभागानं शेतकऱ्यांच्या ई केवायसीची प्रक्रिया येत्या चार दिवसात पूर्ण करावेत असे निर्देश राज्याच्या कृषिमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत.