स्पेशल

शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! कृषीपंपाची थकबाकी असेल तर ‘या’ योजनेचा लाभ घ्या, मात्र ‘इतकी’ रक्कम भरून थकबाकीमुक्त व्हा

Agriculture News : गेल्या काही दिवसांपूर्वी महावितरणची वीज तोडणी मोहीम चर्चेत आली होती. यामुळे रब्बी हंगामातील ऐन सुरुवातीला शेतकऱ्यांपुढे एक वेगळेचं संकट उभा राहिलो होतो. खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे आणि रब्बी हंगाम महावितरणच्या या धोरणामुळे वाया जाऊ शकतो अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत होती.

निश्चितच महावितरणाने त्यावेळी घेतलेला हा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांच्या मुळावर उठला होता. यामुळे शासनाने यामध्ये हस्तक्षेप करत महावितरणाला विज तोडणी मोहीम थांबवण्याचे आदेश निर्गमित केले होते. मात्र महावितरणची आर्थिक परिस्थिती देखील डबघाईला आले असल्याचे सांगितले जात आहे.

हाती आलेल्या आकडेवारीनुसार एकट्या जळगाव जिल्ह्यात 26 हजार कृषी पंप धारकांकडे 192 कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामुळे महावितरण निश्चितच संकटात सापडले असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत आता कृषी पंप धारकांनी आपली थकबाकी निल करावी यासाठी महावितरणाच्या माध्यमातून एक योजना राबवली जात आहे. ही योजना 31 मार्चपर्यंत महाराष्ट्रात सुरू राहणार असून शेतकऱ्यांना 30 टक्के सवलतीचा लाभ घेऊन थकबाकी नील करता येणार आहे.

महावितरणतर्फे सध्या कृषिपंपधारक ग्राहक वगळता सर्वच थकबाकीदार ग्राहकांकडून थकबाकी वसूल करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. थकबाकी असलेल्या ग्राहकांचा आता डायरेक्ट वीजपुरवठा खंडित केला जात आहे. खरं पाहता कृषी पंप धारकांची देखील रब्बी हंगामाच्या तोंडावर वीज खंडित केली जात होती. मात्र, रब्बी हंगामाच्या ऐन सुरुवातीला कृषिपंपधारक ग्राहकांवरील कारवाईमुळे शेतकऱ्यांचे लाखोंची नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली.

शिवाय खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून पूर्णतः वाया गेला असल्याने निदान रब्बी हंगामातून तरी त्यांना थोडेफार पैसे मिळतील या आशेने आणि शेतकऱ्यांनी तसेच शेतकरी संघटनेने आवाज उठवल्याने त्यावेळी थकबाकीदार कृषी पंप धारकांची वीज तोडणीला शासनाने स्थगिती दिली. मात्र आता कृषी पंप धारक ग्राहकांकडील थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.

दरम्यान महावितरणतर्फे महाकृषी ऊर्जा अभियान राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून गेल्यावर्षी शेतकऱ्यांना थकबाकीचे बिल भरताना ५० टक्के सवलत देण्यात आली होती. मात्र यंदा मार्चपर्यंत थकबाकीचे विजबिल भरण्यासाठी सध्या ३० टक्के सवलत देण्यात आली आहे. कृषीपंप धारक शेतकऱ्यांनी या अभियानांतर्गत थकबाकी नील करावी असा उद्देश आहे.

मात्र असे असतानाही कृषिपंपधारकांकडून थकबाकी भरण्यासाठी अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान आता महावितरणकडून या योजनेचा लाभ घेऊन कृषीपंप धारकांनी आपली थकबाकी नील करून घ्यावी असे आवाहन केले जात आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts