Ahilyanagar Breaking : अहिल्यानगर जिल्ह्यातील पुणतांबा येथून एक खळबळ जनक बातमी समोर येत आहे. पुणतांबा येथील गोदावरी नदीतिरी असलेले घृष्णेश्वर महादेव मंदिरातील मूर्तीची विटंबना करण्यात आली असल्याची बाब उघडकीस आली असून यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाटू उसळली आहे.
आज सोमवारी, २३ डिसेंबर रोजी ही घटना समोर आली आहे. महत्त्वाची बाब अशी की श्रीक्षेत्र पुणतांबा येथे घडलेली ही पहिलीच घटना नाही. मागील शनिवारी (ता.२१) मारुती मंदिरातील मूर्तीची सुद्धा विटंबना करण्यात आली होती.
यामुळे, नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाची लाट पाहायला मिळतं आहे. तसेच, अशा समाजकंटकांविरोधात लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
हिंदू संघटना देखील या विरोधात कमालीच्या आक्रमक झाल्या असून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. हिंदूंच्या धार्मिक भावना जाणीवपूर्वक दुखावून जातीय तेढ निर्माण करण्याचा काही समाजकंटकांचा डाव असल्याचे यातून अधोरेखित असून अशा समाजकंटकांचा बंदोबस्त करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या प्रकरणांमध्ये जे आरोपी आहेत अशा सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि तत्काळ कारवाई झाली पाहिजे असे विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाने म्हटले आहे.
जे आरोपी आहेत त्यांच्याविरोधात ताबडतोब कारवाई न झाल्यास संपूर्ण जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे.
संगमनेर शहर पोलीस ठाण्यात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि मातृशक्ती दुर्गा वाहिनी या हिंदू संघटनेकडून याबाबतचे निवेदन देण्यात आले असून यामुळे सध्या पंचक्रोशीत तणावाची परिस्थिती तयार झालेली आहे.