Ahilyanagar News : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला अनेक जागांवर पराभवाचा सामना करावा लागला. त्यावेळी विखे पाटील यांचा भाजपा मध्ये झालेला पक्षप्रवेश भाजपाच्या उमेदवारांच्या पराभवांसाठी कारणीभूत आहे असा आरोप पराभूत उमेदवारांच्या माध्यमातून झाला होता.
पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विखे पाटील यांच्यामुळेचं भारतीय जनता पक्ष समवेत महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीने संपूर्ण राज्यभरात 232 जागांवर विजय मिळवला. नगर जिल्ह्याबाबत बोलायचं झालं तर येथे 12 पैकी दहा जागांवर महायुतीचे भिडू विजयी झालेत.
दहा पैकी चार जागांवर भाजपाचे, चार जागांवर अजित पवार गटाचे आणि दोन जागांवर शिंदे गटाचे उमेदवार विजयी झालेत. दुसरीकडे महाविकास आघाडीला फक्त दोन जागांवर विजय मिळाला एक जागा काँग्रेस आणि एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मिळाली. या ठिकाणी ठाकरे गटाची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली आहे.
खरे तर अहिल्यानगर जिल्ह्यावर गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पकड होती. पण या निवडणुकीत भाजपा प्रणित महायुतीने जिल्ह्याचे राजकीय समीकरण पूर्णपणे बदलून टाकले आहे. या निवडणुकीत भाजपाच्या हिंदुत्ववादी विचारसरणीने जोरदार मुसंडी मारली, भारतीय जनता पक्षाला सर्वात जास्त मते मिळाली आहेत.
अजित दादांच्या राष्ट्रवादीने आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने देखील जिल्ह्यात चांगली चमकदार कामगिरी केलेली आहे. निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, विधानसभेच्या 12 जागांच्या निकालात महायुतीला 13 लाख 77 हजारांहून अधिक मते मिळाली आहे. ऐवढी मते घेवून महायुतीचे 10 आमदार निवडून आलेले आहेत.
तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला प्रत्येकी एक अशा दोनच जागावर समाधान मानावे लागले. विधानसभा निवडणुकीचा हाच ट्रेंड जिल्ह्यात कायम राहिल्यास स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणूका शरद पवार गट, काँग्रेस आणि ठाकरे गटाला जड जाण्याची शक्यता आहे.
नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुती मध्ये समाविष्ट असणाऱ्या तिन्ही पक्षांना मिळून 13 लाख 77 हजार 163 मते मिळालीत. महाविकास आघाडीतील घटक पक्षांना मात्र 6 लाख 84 हजार 42 मते मिळवली आहेत.
महायुतीने जिल्ह्यात महाविकास आघाडीवर 6 लाख 93 हजारांची आघाडी घेतलेली असून ती दुप्पट असल्याने जिल्ह्यात महायुतीने विधानसभा निवडणुकीत आपले वर्चस्व तयार केले असल्याचे स्पष्ट होत आहे. महत्त्वाचे म्हणजे या निकालाचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीवरही परिणाम होण्याची शक्यता असून महायुतीसाठी आगामी निवडणूकीत पोषक वातावरण राहू शकते, असे बोलले जाऊ लागले आहे.
खरे तर विधानसभा निवडणुकीच्या आधीच लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या आणि लोकसभेच्या निवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन्ही जागा महाविकास आघाडीला गेल्यात. यामुळे विधानसभा निवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीला मोठा फटका बसू शकतो असे वाटत होते.
पण महायुतीच्या तिन्ही घटक पक्षातील नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत जोरदार कम बॅक केला आहे. या निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी अधिक मेहनत घेतली. विखे पाटील कुटुंबाची जिल्ह्याच्या राजकारणात आधीपासूनच पकड राहिली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तर लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी विखे पाटील कुटुंब अधिक सावध अन आक्रमक पाहायला मिळाले.
त्यांनी अनेक मतदारसंघात वेगवेगळे राजकीय डाव टाकत काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गटाच्या बड्या नेत्यांचा पराभव घडवून आणला. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून ज्या नेत्याकडे पाहिले जात होते त्या नेत्याचा देखील विखे पाटील यांच्या डावपेच्यापुढे निभाव लागला नाही. संगमनेरचे बाळासाहेब थोरात यांच्या पराभवामागे विखे पाटील आणि त्यांची यंत्रणा होती.
लोकसभेच्या वेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या विरोधात उभे असणारे निलेश लंके यांना बाळासाहेब थोरात यांनी रसद पुरवली होती. यामुळे विखे पाटील हे व्यथित झाले होते आणि त्यांनी थोरात यांना त्यांच्याच होम ग्राउंड वर जाऊन चितपट करायचे हा चंग बांधला. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी जे ठरवलं तसंच झालं. अमोल खताळ यांना उमेदवारी देऊन विखे पाटील यांनी संगमनेरचा गड थोरातांकडून हिसकावून घेतला.
संगमनेरप्रमाणेच राहुरी, नेवासा आणि पारनेर विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या विजयी उमेदवारांना सुद्धा विखे पाटील यांनीचं रसद पुरवलेली होती. लोकसभा निवडणुकीत भिडलेल्या सर्व राजकीय विरोधकांचा विखे पाटील यांनी करेक्ट कार्यक्रम केला. यामुळे भारतीय जनता पक्ष अहिल्यानगर जिल्ह्याचा दादा ठरला तर विखे पाटील कुटुंब हे किंगमेकर ठरले.