स्पेशल

अहिल्यानगर महापालिका पदभरती : 1200 रिक्त पदे असताना फक्त 45 पदे भरली जाणार ! 134 पदांच्या भरतीलाही बसली कात्री

Ahilyanagar News : अहिल्यानगर महापालिकेत गेल्या 18 वर्षांपासून पदभरती झालेली नाही. पण नुकत्याच काही महिन्यांपूर्वी अहिल्यानगर महापालिकेत एक पदभरती जाहीर करण्यात आली. या अंतर्गत 134 रिक्त पदांच्या जागा भरण्याचा निर्णय झाला. मात्र आता या पदभरतीला कात्री बसली आहे. अहिल्यानगर महापालिकेतील पदभरती अंतर्गत आता केवळ 45 महत्त्वाची पदे भरली जाणार आहेत.

खरंतर अहिल्यानगर महापालिकेत विविध पदे रिक्त आहेत, म्हणून आस्थापनावर कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त बोजा पडत आहे. महापालिकेत जवळपास 1200 पदे रिक्त आहेत. म्हणून येथील एका अधिकाऱ्यावर दोन-तीन विभागाचा प्रभारी पदभार सोपवण्यात आला आहे.

यामुळे अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची मोठी हेळसांड होत आहे. अनेक विभागांमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांना घेऊन काम सुरू आहे. खरे तर महापालिकेचा खर्च जास्त आणि उत्पन्न कमी होते यामुळे राज्याच्या नगरविकास विभागाकडून महापालिकेच्या पदभरतीला मान्यता मिळत नव्हती.

पदभरतीसाठी आस्थापनावरील खर्च 35 टक्क्यांपेक्षा अधिक नसावा असा नियम आहे, हेच कारण आहे की अहिल्यानगर महापालिकेच्या पदभरतीला गेल्या काही वर्षांपासून मंजुरी मिळत नव्हती. परंतु गतवर्षी नगर विकास विभागाकडून पदभरतीला मान्यता मिळाली.

यामुळे रिक्त पदांच्या 134 जागा भरण्याचा निर्णय झाला. पण, मध्यँतरी महापालिका आस्थापनावरील कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू झाला आणि यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर पावणेदोन कोटींचा अतिरिक्त बोजा पडला.

यामुळे आस्थापनावरील खर्च 80 टक्क्यांवर पोहोचला. हेच कारण आहे की 134 जागांच्या पदभरती प्रक्रियेला आता कात्री बसली असून आता फक्त 45 महत्त्वाची पदे भरली जाणार आहेत. याच्या बिंदू नामावली पडताळणीसाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव सुद्धा सादर झाला आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की महापालिकेत 2870 पदे मंजूर आहेत. मात्र सध्या फक्त 1501 कर्मचारी कार्यरत असून महापालिकेत जवळपास 1200 हून अधिक जागा रिक्त आहेत.

यातील विविध पदाच्या 134 जागा भरण्यास मान्यता देण्यात आली होती मात्र आता यामध्ये कपात करण्यात आली असून फक्त 45 पदे भरली जाणार आहेत.

या पदभरती अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 15, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) 3, कनिष्ठ अभियंता (ऑटोमोबाईल) 1, अभियांत्रिकी सहाय्यक 8, विद्युत पर्यवेक्षक 3, लिपीक टंकलेखक 13, संगणक प्रोग्रॅमर 1, पशुवधन पर्यवेक्षक 1 ही पदे भरली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts