Ahilyanagar News : अहिल्या नगर जिल्ह्यातून आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येतेय. खरं तर आज विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत राज्यातील अनेक विधानसभा मतदारसंघातील निकाल हे जाहीर झाले आहेत. आणखी काही तासात महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 288 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट होणार आहे.
तत्पूर्वी अहिल्या नगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघातून एक मोठा धक्कादायक निकाल समोर आला आहे. संगमनेर विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला आहे. खरे तर संगमनेर हा ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला. ते तब्बल आठ वेळा या विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेत.
त्यांनी 40 वर्षे या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले मात्र या निवडणुकीत महायुतीची जी लाट आली त्या लाटेत बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला. यामुळे या पराभवाची सध्या संपूर्ण राज्यभर चर्चा आहे. थोरात यांच्या खेम्यात मात्र यामुळे अस्वस्थता पसरली आहे. थोरात हे सहज विजयी होतील अशी शक्यता अनेकांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली होती.
सुजय विखे पाटील त्यांच्या विरोधात उभे राहिले असते तर निकाल वेगळा लागला असता मात्र खताळ यांच्या उमेदवारीमुळे थोरातांसमोर मोठे आव्हान नाही अशाच चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. खरे तर बाळासाहेब थोरात यांना महाविकास आघाडी कडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट केले जात होते.
शरद पवार यांनी देखील बाळासाहेब थोरात यांना राज्यात मोठी जबाबदारी मिळायला हवी असे विधान केले होते. मात्र मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतानाही आणि थोरात यांच्यासाठी सहानुभूतीची लाट असतानाही बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला. या निकालामुळे मात्र सर्वत्र विखे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीचा बदला घेतला अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
खरंतर, खासदारकीच्या निवडणुकीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात थोरात यांनी निलेश लंके यांना भरपूर मदत केली होती. लंके यांच्या विजया मागे थोरात यांचा सिंहाचा वाटा होता. मात्र, लंके यांना मदत करून थोरात यांनी स्वतःचेच नुकसान करून घेतले असेचं या निकालातून दिसत आहे. दरम्यान महायुतीचे अमोल खताळ यांच्या विजयात विखे पाटील यांचा मोठा वाटा राहिला आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर संगमनेरात विखे पाटील आणि थोरात यांच्यामधील राजकीय संघर्ष टोकाला भिडला. सुजय विखे पाटील हे या मतदारसंघात चाचपणी करत असताना अन त्यानंतर प्रचारादरम्यानही येथे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झालेत. गेल्या चार दशकांपासून या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व गाजवणार्या माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांना मात्र यावेळी पराभवाचा धक्का बसला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर झाली अन आजी-माजी महसूलमंत्र्यांमधील राजकीय वैर पुन्हा उफाळून आले. त्यातून दोघांनीही एकमेकांच्या मतदारसंघात जावून कुरघोड्या करण्यासह एकमेकांविरोधात प्रबळ उमेदवार उभे करुन त्यांना बळही देण्याचे काम केले. विखे पाटील यांनी संगमनेर मधून शिंदे गटाचे उमेदवार अमोल खताळ यांना बळ देण्याचे काम केले तर बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघात प्रभावती घोगरे यांना बळ दिले.
शिर्डी मध्ये मात्र राधाकृष्ण विखे पाटील हे विजयी झालेत दुसरीकडे संगमनेर मध्ये थोरात यांना फटका बसला. शेवटीशेवटी संगमनेर व शिर्डीतील निवडणूक लक्षवेधी ठरली होती. मात्र त्यात सरशी मिळवत विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपला बालेकिल्ला शाबूत ठेवून महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांच्या करवी आजवर अभेद्य मानल्या गेलेल्या बाळासाहेब थोरात यांच्या बुरुजाला सुरुंग लावले.
माजीमंत्री थोरात यांच्या चार दशकांच्या राजकीय कारकीर्दीला विखे पाटील यांनी विराम दिल्याने संपूर्ण जिल्ह्यात या निकालाची सध्या चर्चा सुरु आहे. खरे तर थोरात हे सीएम कॅंडिडेट म्हणून प्रोजेक्ट करण्याचे काम काँग्रेस पक्षाकडून सुरू होते मात्र या निवडणुकीने महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापण्याच्या स्वप्नांसह थोरात यांच्या मुख्यमंत्रीपदावरही पाणी फेरले आहे.