Ahmednagar News : 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात शिवप्रभूंचा जयंती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यावर्षी देखील शिवरायांची 393वी जयंती मोठ्या उत्साहात राज्यासह संपूर्ण हिंदुस्तानात साजरी केली जात आहे. प्रत्येक स्तरावरून शिवप्रभुंना मानवंदना देण्यासाठी, मानाचा मुजरा करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
राजकारणातून, समाजकारणातून तसेच उद्योग जगतातून शिव जन्मदिनी भव्य दिव्य अशा सोहळ्यांचे आयोजन पहावयास मिळत आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील एका शिवभक्त तरुण शेतकऱ्याने देखील शेतकऱ्याच्या, गोरगरीब कष्टकरी रयतेच्या जाणता राजाची जयंती अनोख्या पद्धतीने साजरा केली आहे.
जिल्ह्यातील मौजे लोणी गावातील एका गहू उत्पादक शेतकऱ्याने शिवप्रभूंच्या जयंतीदिनी त्यांना मानवंदना म्हणून आपल्या गव्हाच्या पिकात शिवप्रतिमा साकारली आहे. त्यामुळे सध्या या शिवभक्त शेतकऱ्याचीं चर्चा पंचक्रोशीत रंगली आहे. या तरुण शेतकऱ्याने आपल्या गव्हाच्या पिकात साकारलेली शिवप्रतिमा एवढी सुरेख आहे की ही प्रतिमा पाहण्यासाठी परिसरातील लोक गर्दी करत आहेत. सोशल मीडियामध्ये देखील या तरुण शेतकऱ्याची या कामाची वाहवा होत आहे.
अनेकांनी या तरुण शेतकऱ्यावर कौतुकाचे सुमन उधळले आहेत. कुणाल विखे नामक लोणी गावातील प्रयोगशील गहू उत्पादक शेतकऱ्याने आपल्या गव्हाच्या पिकात ही शिवप्रतिमा साकारली आहे. शिवप्रभूंची ही प्रतिमा सुरेख बनवण्यासाठी कुणाल गेल्या पाच दिवसांपासून मेहनत घेत आहेत. आपल्या गव्हाच्या पिकात साकारलेली ही प्रतिमा शिवभक्तांना भुरळ पाडत आहे.
कुणाल यांनी दिलेल्या माहितीनुसार ही शिवप्रतिमा गव्हाच्या पिकात साकारण्यासाठी सर्वप्रथम त्यांनी शिवप्रभूंच्या प्रतिमेची रांगोळी तयार केली. या रांगोळी मध्ये मग गव्हाचे बियाणे टाकण्यात आले. यानंतर या बियाण्याला पाणी भरण्यात आले. त्यानंतर पाच ते सहा दिवसात गव्हाची उगवण झाली. शिवप्रभूंच्या या गहू पिकात साकारलेल्या प्रतिमेची लांबी 24 फूट असून रुंदी 18 फूट आहे.
यासाठी दहा किलो बियाण्याचा त्यांनी वापर केला आहे. दरम्यान या गहू उत्पादक शेतकऱ्याने साकारलेल्या शिवप्रतिमेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. निश्चितच अहमदनगरच्या या शेतकऱ्याने शिव प्रभूंच्या उपकाराचीं जाण म्हणून केलेला हा उपक्रम आणि शिवप्रभुंना त्यांनी दिलेली अभिनव मानवंदना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.