स्पेशल

सरकारने दिलेल्या 3 हजार रुपयांचे अहमदनगरच्या लाडक्या बहिणींनी काय केले ? कुणी सुरू केला शाल बनवण्याचा व्यवसाय तर कोणी सुरू केलं शेळीपालन !

Ahmednagar News : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला. महायुतीच्या सर्वच घटक पक्षातील काही प्रमुख नेत्यांचा गत लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. यामध्ये अनेक केंद्रीय मंत्र्यांचा देखील समावेश होता हे विशेष. दरम्यान लोकसभा निवडणुकीत आलेल्या पराभवातून धडा घेत आता महायुतीने आगामी विधानसभा निवडणुकीकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे.

लोकसभा निवडणुकीत सारखाच फटका विधानसभा निवडणुकीत बसू नये यासाठी महायुतीने सावध भूमिका घेतली आहे. यासाठी शिंदे सरकारने राज्यात वेगवेगळ्या योजना सुरु करण्याचा धडाका लावला आहे. गेल्या काही दिवसांच्या काळात शिंदे सरकारने राज्यात अनेक महत्त्वकांक्षी योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा देखील समावेश होतो.

ही योजना मध्यप्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे. एमपी मध्ये सुरू असणाऱ्या लाडली बहना योजनेअंतर्गत तेथील पात्र महिलांना दरमहा बाराशे रुपये दिले जात आहेत. मात्र राज्यातील लाडकी बहिण योजनेसाठी पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत.

यासाठी राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला पात्र ठरणार आहेत. विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना याचा लाभ मिळणार आहे. कुटुंबातील एक अविवाहित महिला देखील याच्या लाभासाठी पात्र राहणार हे विशेष.

वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार आहे.यासाठी एक जुलैपासून अर्ज भरले जात असून 30 सप्टेंबर 2024 ही अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक आहे. या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये देण्यात आले आहेत.

महत्त्वाचे म्हणजे राज्यातील काही महिलांनी सरकारकडून मिळालेल्या या तीन हजार रुपयांमधून स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. या छोट्याशा व्यवसायातून अहमदनगर जिल्ह्यातील अनेक महिलांनी आपल्या कुटुंबाचे जीवन सुधारले आहे. या योजनेच्या पैशातून व्यवसाय सुरू करणाऱ्या महिलांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले आहे.

कुणी कपडे शिलाईचा तर कुणी शाल बनवण्याचा व्यवसाय सुरू केला

राहता तालुक्याच्या साकुरी येथील प्रतिभा धनंजय गोराणे या महिलेला लाडकी बहिण योजनेचे तीन हजार रुपये मिळाले आहेत. या पैशांच्या मदतीने प्रतिभा यांनी शिलाई मशीन खरेदी केली आहे. प्रतिभा यांचे पती रोजंदारीने काम करतात. दरम्यान, लाडकी बहीण योजनेच्या पैशामुळे प्रतिभा यांना शिलाई मशीन खरेदी करता आले असल्याने त्यांचा आता शिलाईचा व्यवसाय सुरू झाला आहे.

त्यामुळे आता त्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळणार असून यातून त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागेल अशी आशा आहे. शिर्डी जवळ राहणाऱ्या निकिता अमोल आढाव यांनी शाल बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. निकिता यांचे पती मोलमजुरी करतात. घरची आर्थिक परिस्थिती सुद्धा बेताची आहे. यामुळे त्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे आल्यानंतर शाल बनवण्याचा व्यवसाय सुरू केला.

या पैशांमधून त्यांनी कच्चे मटेरियल आणले आणि हा व्यवसाय सुरू केला आहे. शिर्डी येथे साईबाबाच्या दर्शनासाठी येणारे भाविक घरी परतताना येथून काही ना काही भेटवस्तू घेऊन जातात. अनेकजण शाल ही होऊन जातात. यामुळे निकिता यांनी हा व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसायामुळे त्यांचे कुटुंबाचे पालन पोषण होणार आहे.

लाडक्या बहिणीच्या योजनेतून सुरू झाला शेळीपालनाचा व्यवसाय

राहता तालुक्यातील रत्ना बाळासाहेब पगारे यांना लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये मिळाल्यानंतर त्यांनी शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला. रत्ना पगारे आणि त्यांच्या दोन सुनांना याचा लाभ मिळाला आहे. या तिघींनी मग एकत्रितपणे शेळीपालनाचा हा व्यवसाय सुरू केलाय. या माध्यमातून पगारे कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts