Akola News : राज्यातील शेतकरी बांधव प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील न डगगता आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून शेती व्यवसायात लाखो रुपये कमवण्याची सातत्यता जोपासत आहेत. खरं पाहता गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना हवामानातील बदलामुळे मोठा फटका बसला आहे. अनेकांना शेतीमध्ये येणारा उत्पादन खर्च देखील काढणे मुश्किल झाले आहे.
अशातच मात्र अकोला जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी नवीन मार्ग चोखंदळत चिया या विदेशी पिकाची शेती करून लाखो रुपयांचे उत्पन्न कमावण्याची शाश्वती निर्माण केली आहे. खरं पाहता चिया हे पीक अमेरिकेत मोठ्या प्रमाणात उत्पादित होते. मात्र अलीकडील काही काळात भारतातही या पिकाची लागवड वधारू लागली आहे. काही प्रयोगशील शेतकरी या पिकाच्या शेतीमध्ये रस दाखवू लागले आहेत.
अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी येथील काही तरुण प्रयोगशील शेतकऱ्यांनी देखील या पिकाची शेती सुरू केली आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील चार शेतकरी मित्रांनी एकत्र येत youtube च्या माध्यमातून चिया पिकाच्या शेतीचे तंत्र शिकून घेतले. युट्युबवर धडे गिरवल्यानंतर या चार मित्रांनी चिया शेतीला सुरुवात केली. यावर्षी प्रथमच त्यांनी चिया पिकाची शेती सुरू केली असून प्रत्येकी दोन एकर क्षेत्रावर या पिकाची त्यांनी लागवड केली आहे.
ओम प्रकाश वानखडे, गजानन असे प्रयोगशील शेतकऱ्यांचे नावे आहेत. आणि ते पिंजर आणि मोरळ या गावातील रहिवासी आहेत. या प्रयोगशील शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या पिकात रोगराईचा आणि किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने होत नसल्याने या पिकावर कीटकनाशक फवारण्याची अजिबात गरज भासत नाही. साहजिकच उत्पादन खर्चात बचत होते. शिवाय हे पीक जंगली श्वापद देखील खात नाहीत साहजिकच जंगली प्राण्यांपासून हे पीक संरक्षित असल्याने शेतीला कुंपण घालण्याची देखील गरज भासत नाही. पीक राखण्यासाठी देखील अधिक खर्च येत नाही.
निश्चितच कमी खर्च आणि कमी कष्टात या पिकापासून चांगले उत्पादन मिळते. या चारही शेतकऱ्यांनी नोव्हेंबर 2022 मध्ये या पिकाची शेती सुरू केली आहे. विशेष म्हणजे या पिकासोबतच इतरही पिकांची या शेतकऱ्यांनी शेती केली आहे. दरम्यान या शेतकऱ्यांनी लागवड केलेली चियाचे पीक आता उत्पादन देण्यासाठी तयार झाले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि दिल्ली येथील बाजारात चिया पिकाला मागणी आहे. या शेतकऱ्यांच्या मते या पिकालां एकरी जोपासण्याचा खर्च 5000 पर्यंत येतो.
आणि एकरी पाच ते सात क्विंटल पर्यंतच हमखास उत्पादन यातून त्यांना मिळणार आहे. पंधरा ते वीस हजार रुपये प्रति क्विंटल असा दर लक्षात घेता त्यांना 2 एकरातून दोन लाखांपर्यंतचे उत्पन्न होणार आहे. या चारही शेतकऱ्यांनी प्रत्येकी दोन एकर क्षेत्रात चिया शेती केली असल्याने या चौघांना दोन-दोन लाखांचे उत्पन्न मिळणार आहे. निश्चितच अवघ्या चार महिन्यात या शेतकऱ्यांना दोन एकरात दोन लाखांची कमाई होणार असल्याने हा नवखा प्रयोग त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला असून इतरांसाठी मार्गदर्शक राहणार आहे.