Ahmednagar Farmer Success Story : वाल्याचा वाल्मिकी झाला अशी एक म्हण आपल्याकडे आहे. पण प्रत्यक्षात तसे घडते का? होय, याचे एक खूप मोठे उदाहरण अहमदनगर जिल्ह्यात पाहायला मिळाले. आदिवासी पारधी समाजातील भावंड
एकेकाळी होते गुन्हेगारी विश्वात, पण आज त्यांनी सगळं वाईट कर्म सोडून शेती करतात. केवळ शेती करतच नाहीत तर त्यातून ते लाखोंचे उत्पन्न घेत आहेत. ही कहाणी आहे खरातवाडी (ता. श्रीगोंदा) भागातील भोसले बंधूंची !
गोप्या कळशिंग भोसले, प्रवीण कळशिंग भोसले व बाबासाहेब कळशिंग भोसले असे यांची नावे आहेत. हे तिघेही तरुण वयात गुन्हेगारी क्षेत्रात पडले. नंतर वाट्याला आला सततच्या तुरुंगवास. या दरम्यान त्यांच्या कुटुंबाची झलेली ससेहोलपट पाहून त्यांचे मन द्रवले. त्यांनी गुन्हेगारी क्षेत्र सोडून देण्याचा विचार केला.
परंतु गुन्हेगारीचा शिक्का त्यांच्यावर होता. त्यामुळे पोलीस अनेक तपासकामी त्यांच्या घरी येत. त्यांना याचीही भीती बसली अन ते त्यामुळे घरी यायचेही कधीकधी टाळत असत. तुरुंगवास झाला म्हणजे जामीन आला व त्यासाठी शेळ्या, बकऱ्या विकाव्या लागायच्या. या सर्वाला हे तिघेही कंटाळले होते.
जीवनात आला टर्निंग पॉईंट
लोकशिक्षण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद काळे व जयश्री काळे यांच्याशी त्यांची भेट झाली. विविध गोष्टींतून, विविध प्रयत्नांनी त्यांनी त्या तिघांचे प्रबोधन केले. पोलिसांची भीती कमी केली. यातच त्यांना बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी समुपदेशन केले.
याचा चांगला परिणाम झाला. त्यांनी गुन्हेगारी विश्वातून बाहेर पडत शेती करण्याचे ठरवले. त्यांनी शेती नावाला केली नाही तर त्यातून उत्पन्न कमावले. आज त्यांच्या शेतामध्ये विविध नगदी पिके आहेत.
नुकतेच गोपीनाथ कळशिंग भोसले याने त्याच्या शेतातील कांदा विकला. त्यातून त्यांना दीड लाख रुपयांचा नफा झाला. प्रवीण व बाबासाहेब हे देखील शेतीतून चांगले उत्पन्न घेत आहेत.
काय म्हणतात जयश्री काळे
आदिवासी पारधी समाजाच्या शिक्षण, रोजगार व अंधश्रद्धा अशा अनेक समस्या आहेत. आम्ही यावर काम करत आहोत. पोलिस प्रशासन व इतर शासकीय विभागांचे आम्हाला सहकार्य लाभले तर केले तर
पुढील आठ-दहा वर्षांत आदिवासी पारधी समाजाची स्थिती बदलून दाखवू असा विश्वास लोकशिक्षण प्रतिष्ठान संस्थेच्या जयश्री काळे यांनी व्यक्त केलाय.