महायुतीकडून मंत्री राधाकृष्ण विखे हेच शिर्डी विधानसभेचे उमेदवार असतील, अशी शक्यता आहे. तिकीट वाटप होण्यास वेळ असला तरी, विखेंनाच महायुतीचं तिकीट मिळणार आहे. लोकसभेत पराभूत झाल्यानंतर सुजय विखेंनी, आता आपला मोर्चा शिर्डी विधानसभेकडे वळवला. आपण कायमचं शिर्डी येणार असल्याचं वक्तव्य, सुजय विखेंनी मार्च महिन्यातच केलं होतं. राहाता शहरात महिला बचत गटाला साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात विखेंनी आपल्या मनातील दुरावा स्पष्ट सांगितला होता. त्यावेळी सुजय विखे हे नगर दक्षिण लोकसभेऐवजी शिर्डी विधानसभा लढतील का, असा प्रश्न अनेकजण विचार होते. मात्र तसं झालं नाही.
सुजय विखेंनी लोकसभा लढवली आणि त्यात त्यांना पराभूत स्विकारावा लागला. मात्र आता विखे रोजच शिर्डीत दिसत आहेत. एकीकडे मंत्री विखे व दुसरीकडे सुजय विखे यांचे कोठे ना कोठे, कार्यक्रमाच्या निमित्ताने रोज दौरे सुरु आहेत. विखेंसाठी ही निवडणूक खरंच अवघड आहे का..? विरोधकांची इच्छा यावेळी पूर्ण होईल का..? याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट.
मित्रांनो, बातमी सुरु करण्यापूर्वी आपण बुधवारची ब्रेकींग बातमी पाहू… बातमी आहे, संगमनेर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. त्यात ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विखेंवर घाणाघाती टिका केली. चांगले वातावरण खराब करण्याचे काम सुरु आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या बातम्या पाठविण्यासाठी बाहेरच्या राज्यातील यंत्रणा कार्यरत झाल्या आहेत, अशी टिका थोरातांनी विखेंचे नाव न घेता केली. आपल्या भाषणाचे व्हिडीओ एडिट करुन पाठवले जात आहेत. जनतेच्या मनात विष कालविण्याचे उद्योग सुरु आहेत, असा आरोपही थोरातांनी केला. आता थोरातांनी हा आरोप का केला, हे पाहू…
सुजय विखेंनी तीन दिवसांपूर्वी थेट मुंबईत जाऊन एका चॅनलला मुलाखत दिली. राजकारण नगरला करायचं आणि मुलाखती पुण्या- मुंबईला जाऊन द्यायच्या, असं विखेंनी का केलं, हे समजलं नाही. पण या मुलाखतीत विखेंनी संगमनेरमधून लढण्याची इच्छा असल्याचा पुनरुच्चार केला. सुजय विखेंच्या या इच्छा प्रदर्शनानंतर आता लगेच थोरातांनी मोठा आरोप केला. लाखो रुपये खर्चून बाहेरच्या यंत्रणा आणून, काही जण सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी करत असल्याचं त्यांच म्हणणं होतं.
सुजय विखेंनी मुंबईत दिलेल्या त्या मुलाखतीतही, आपला पराभव हा सोशल मीडियाद्वारे चुकीच्या बातम्या दिल्यानेच झाला, असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळेच थोरातांच्या आरोपांमधलं तथ्य शोधावं लागतं. आता हा आरोप करताना थोरातांनी कुणाचंही नाव घेतलं नाही. पण त्यांचा रोख कदाचित विखेंवरच असावा, हेही लपलं नाही. मग आपल्यावर लोकसभेला वापरलेली युद्धनिती, विखे विधानसभेत विरोधकांवरच वापरत आहेत का, हा प्रश्न पडतो.
विरोधक एक झाले तर काय होतं हे विखेंनी, अगोदर गणेश कारखाना निवडणुकीत व त्यानंतर लोकसभा निवडणुकीत पाहिलं. ज्या विखेंचा कधीच पराभव होत नव्हता, त्या विखेंना पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे लोकसभा झाल्यानंतरही विखेंच्या विरोधक थंडावले नाहीत. त्यांच्या विरोधकांत रोज वाढ होतानाच दिसत आहे.
थोरात, घोगरे यांच्यानंतर स्वपक्षातील विवेक कोल्हे आणि डाँ. राजेंद्र पिपाडा यांनी विखेंना त्यांच्याच मतदारसंघात कोंडीत पकडले आहे. पिपाडा यांनी तर थेट पक्षाकडे भाजपची उमेदवारीही मागितली आहे. हे सगळं पाहता, विखेंना यावेळची विधानसभा निवडणुक सोप्पी नसल्याचं दिसतंय. विखे पिता-पुत्र यावेळी ताकही फुंकून पिण्याच्या मनस्थितीत दिसत आहेत.