Balasaheb Thorat News : संगमनेर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे पराभूत उमेदवार ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे निवडणुकीनंतर पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर आहेत. बाळासाहेब थोरात यांनी काल दिल्लीमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली असून आज त्यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे.
आज, शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी, आज आम्ही माननीय शरद पवार साहेबांची भेट घेतली. इतरही उमेदवार या ठिकाणी आले आहेत.
मी माननीय खरगे साहेबांना सुद्धा काल भेटलो आहे. एकंदर सगळी चर्चा आम्ही करतो आहोत. निकालामुळे राज्यामध्ये अतिशय संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे.
बीजेपीचा एवढा चांगला स्ट्राईक रेट कसा? लोकसभेला अत्यंत वाईट अवस्थेत असणारी बीजेपी विधानसभेत एवढे पुढे कशी? यामुळे ही निवडणूक लोक संशयाने पाहत आहेत, म्हणूनच आम्ही चर्चा करत आहोत.
काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही सर्वांशी चर्चा करतोय. तसेच, सध्या ईव्हीएम बद्दल जनतेच्या मनात शंका असेल तर सत्ताधाऱ्यांना बॅलेट पेपरची अडचण काय ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सर्वोच्च न्यायालयाने देखील या संदर्भात निर्णय हा जनतेला अपेक्षीत असा दिला पाहिजे.
संशयाचे वातावरण दूर केले पाहिजे, असे थोरात यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी देखील या विषयावर चर्चा केली.
महाराष्ट्राचे राजकारण, काँग्रेसची पुढची दिशा, हे सर्व ठरण्याच्या दृष्टिकोनातून आमच्यात चर्चा झाली असल्याचे थोरात यांनी सांगितले. निकालाबद्दल देखील जनतेच्या मनात संशयाचे वातावरण आहे.
त्यामुळे या संदर्भात पुढे काय करायचे ? याबाबत देखील आमच्यात चर्चा झाली असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल होऊ शकतात अशा काही चर्चा मध्यंतरी समोर आल्या होत्या. मात्र बाळासाहेब थोरात यांनी या चर्चेचे खंडन केले आहे.
ईव्हीएम विरोधात शंकेचे वातावरण असून यासंदर्भात योग्य वेळी राहुल गांधी यांची देखील आपण भेट घेणार. तसेच मारकडवाडी मधील नागरिकांनी जी भूमिका घेतली आहे तशी भूमिका राज्यातील अनेक गावांमध्ये पाहायला मिळू शकते असा दावा देखील त्यांनी केला आहे.
अनेक गावांमधून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची भूमिका समोर येत आहे. महाराष्ट्रात संशयाचे वातावरण आहे आणि यामुळे पुढची वाटचाल काय असेल? हे ठरवले जात असल्याचे थोरात यांनी यावेळी स्पष्ट केले.