Balasaheb Thorat News : विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला प्रचंड बहुमत दिले तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा पार सुपडा साफ झाला. महाविकास आघाडीतील काँग्रेस सहित सर्वच पक्षाने सपाटून मार खाल्ला. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यातील काँग्रेस पक्षसंघटनेत मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा रंगली होती. विधानसभा निवडणुकीत सुपडा साफ झाल्यानंतर नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला अशा चर्चा रंगल्या होत्या.
मात्र, अजूनही नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावर विराजमान आहेत. पण, आता महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होण्याची शक्यता असून लवकरच पक्ष संघटनेत खांदेपालट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान पक्ष संघटनेत खांदेपालट करताना नगर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर एक मोठी जबाबदारी सोपवली जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
खरे तर बाळासाहेब थोरात यांना आपल्याच बालेकिल्ल्यात पराभवाचा सामना करावा लागलायं. थोरात यांनी तब्बल 40 वर्ष संगमनेरचे प्रतिनिधित्व केले आणि त्यांना काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट केले जात होते. पण, विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
या पराभवामुळे थोरात व काँग्रेस समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पाहायला मिळाला. मात्र आता बाळासाहेब थोरात यांच्यावर एक मोठी जबाबदारी येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाना पटोले यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी काढून त्यांना आता विधिमंडळ गटनेतेपदी नियुक्त केले जाऊ शकते.
तर काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख यांना मुख्य प्रतोद म्हणून नेमले जाण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावर बाळासाहेब थोरात यांची वर्णी लागणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. खरे तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी 5 नेत्यांची नावे चर्चेत आहेत.
यामध्ये विश्वजीत कदम, यशोमती ठाकुर, सुनील केदार, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात यांचा समावेश आहे. यामुळे आता या पाचपैकी कोणाला संधी मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे राहील. मात्र या पाचपैकी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नावाची चर्चा सर्वाधिक होताना दिसत आहे.
यामुळे महाराष्ट्र काँग्रेसच्या संघटनेत नेमके कोणकोणते बदल होणार? नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवल्यास त्यांच्या जागेवर कोण येणार? नाना पटोले यांना विधिमंडळ गटनेते पदी नियुक्त केले जाणार का? या सर्व गोष्टी पाहण्यासारख्या राहणार आहेत.