Balasaheb Thorat News : संगमनेरातील बाळासाहेब थोरात यांचा 40 वर्षांचा विजयाचा वारू एका 40 वर्षीय तरुणाने रोखला. संगमनेर म्हणजे थोरात आणि थोरात म्हणजे संगमनेर हे संगमनेरचे चित्र चाळीस वर्षीय अमोल खताळ यांनी पूर्णपणे पालटले आहे. खरंतर बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर चे 40 वर्षे प्रतिनिधित्व केले. ते या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते. काँग्रेसकडून किंबहुना शरद पवार गटाकडून देखील बाळासाहेब थोरात यांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न कुठेतरी सुरू होता. मात्र याच बाळासाहेब थोरात यांना आपली आमदारकी सुद्धा वाचवता आली नाही. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील हे सातत्याने मुख्यमंत्री सोडा ते साधे आमदारही होणार नाहीत असे म्हणत त्यांना डीवचण्याचा प्रयत्न करत होते.
त्यावेळी कदाचित या गोष्टीकडे कोणी गांभीर्याने लक्ष दिले नाही, तसेच बाळासाहेब थोरात हे देखील या बाबतीत गाफिल राहिल्याचे दिसले. त्यांनी नवख्या खताळांना फारच हलक्यात घेतले आणि खताळ यांनी राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे सुपुत्र डॉक्टर सुजय विखे पाटील यांची रसद घेऊन बाळासाहेब थोरात यांना चारीमुंड्या चित केले. यामुळे बाळासाहेब थोरात यांचा पराभव आणि अमोल खताळ या नवख्या तरुणाचा हा मोठा विजय सध्या संपूर्ण राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. पण बाळासाहेब थोरात यांचे त्यांच्याच बालेकिल्लात पानिपत का झालं ? याचाच आज आपण आढावा घेणार आहोत.
विखे पाटील आणि थोरात या दोन राजकीय कुटुंबातील संघर्ष हा महाराष्ट्राला काही नवखा नाही. या दोन्ही राजकीय कुटुंबातील संघर्ष गेल्या लोकसभा निवडणुकीत अधिक टोकाला पोहोचला. नुकत्याच सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या विरोधात बाळासाहेब थोरात यांनी फिल्डिंग लावली. निलेश लंके हे नगर दक्षिणचे खासदार झाले मात्र ते खासदार झालेत ते थोरात यांच्या बळामुळेच. थोरात यांनी लंके यांना रसद दिली म्हणून सुजय विखे पाटील पराभूत झालेत आणि याच पराभवाची सल काढण्यासाठी आता किल्ले संगमनेर काबीज करायचेच असा चंग विखे कुटुंबाने बांधला. यासाठी त्यांनी मोर्चे बांधणी सुरू केली.
लोकसभा निवडणुका झाल्यात आणि विखे पिता पुत्रांनी संगमनेरात आपले दौरे वाढवलेत. विशेष म्हणजे सुजय विखे पाटील यांनी थोरात यांच्या गावी जाऊन त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी दंड थोपटलेत. मात्र मध्यंतरी सुजय विखे यांच्या सभेत वसंतराव देशमुख यांनी थोरात यांची कन्या जयश्रीताई थोरात यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि त्याच ठिकाणी माशी शिंकली. सुजय विखे यांचा विधानसभा निवडणूक लढवण्याच्या मनसुब्यावर पाणी फिरले. पण, तरीही विखे पाटील यांनी संगमनेरवर लक्ष केंद्रित ठेवले.
सुजय विखे पाटील यांना पक्षाने त्या प्रकरणामुळे तिकीट नाकारले. पण विखे पाटील यांच्याच पुढाकारामुळे ही जागा शिंदे गटाकडे जात तेथून विखे कुटुंबाचे अगदीच निकटवर्तीय अमोल खताळ यांना शिंदे गटाकडून उमेदवारी बहाल झाली. सुजय विखे पाटील यांनी अमोल खताळ यांच्या समवेत संगमनेरात कार्यकर्त्यांची एक नवी फळी तयार केली. निमोन, तळेगाव नंतर साकुर भागात कार्यकर्त्यांना हाताशी घेत विखे पाटील आणि खताळ यांनी संगमनेरचा कोपरा न कोपरा पिंजून काढला.
थोरात यांच्या पराभवामागे कोणाची फितुरी ?
बलाढ्य बाळासाहेब थोरात यांना 40 वर्षाच्या अन राजकारणातील नवख्या तरुणाने संगमनेरच्या खिंडीत रोखलं. मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणारे थोरात आपली आमदारकी वाचवू शकले नाहीत. हा निकाल फक्त थोरात यांच्यासाठीच धक्कादायक होता असे नाही तर राजकारणातील अनेक तज्ञांनी हा निकाल पाहून आश्चर्य व्यक्त केले. अनेकांनी यावर चिंता व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्यजित तांबे यांच्या भेटीदरम्यान थोरात यांच्या पराभवावर चर्चा करत त्यावर दुःख व्यक्त केले.
खरे तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि त्याचा दुवा थोरात साहेब ठरलेत. ते पक्षाचे ज्येष्ठ नेते यामुळे पक्षाची बांधणी करणे सोबतच मंत्री या नात्याने संपूर्ण महाराष्ट्राकडे लक्ष देताना त्यांनी आपला मतदारसंघ पोरका केला. थोरात साहेबांचे मतदारसंघाकडे फारसे लक्ष राहिले नाही. सामान्य कार्यकर्त्यांना आणि मतदारांना थोरात साहेबांची भेट मिळणे दुर्मिळ होऊ लागले. यामुळे कुठे ना कुठे मतदारांमध्ये नाराजी होती आणि ते योग्य संधीची आणि योग्य व्यक्तीची वाट पाहत होते.
थोरात साहेबांनी ज्या लोकांवर जबाबदारी दिली होती त्या लोकांनी फक्त ठेकेदारांना जवळ केले. साहेबांच्या जवळच्या कार्यकर्त्यांपैकी काहींनी नदीचे लचके तोडलेत तर काहींवर जमीन बळकावण्याचा आरोप झाला. मध्यंतरी राज्यात सत्ता परिवर्तन झाले मात्र साहेबांच्या कार्यकर्त्यांचा मुजोरीपणा काही कमी झाला नाही. तालुक्यात विकास कामे झालीत मात्र त्याचे ठेके थोरात साहेबांच्या जवळच्या पदाधिकाऱ्यांनाच मिळाले असा आरोप झाला. या ठेकेदारांनी रस्ता तयार केला तर त्या रस्त्याची घडी होईल असा बनवला.
विकास कामांचे ठेके काही मोजक्याच लोकांना मिळालेत. काँग्रेस पक्षातील महत्त्वाची पदे ठराविक लोकांनाचं देण्यात आलीत. ठराविक ठेकेदारांना आणि ठराविक घरांमध्येच पक्षाची पदे गेलीत आणि यामुळे निष्ठावंत कार्यकर्ते देखील कुठे ना कुठे नाराज झालेत. याच सर्व गोष्टी थोरात यांच्या अंगलट आल्यात. जो निष्ठावान सामान्य कार्यकर्ता होता तो या घटनाक्रमात मागे राहिला अन साहजिकच त्याच्या मनात नाराजी होती. यामुळे जेव्हा युवा संवाद यात्रा निघाली त्या यात्रेला युवा वर्गाने अपेक्षित प्रतिसाद दिला नाही. जयश्रीताई थोरात यांनी थोरात हे तालुक्यातील सात लाख जनतेचे बाप आहेत असे म्हणत सुजय विखे पाटील यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला.
जयश्री ताईंच्या या वक्तव्यावर थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी जोरदार शिट्ट्या आणि टाळ्या वाजवल्यात. जयश्री ताईंचे हे वक्तव्य आणि व्हिडिओ संपूर्ण नगरभर त्यांच्याच कार्यकर्त्यांनी पसरवलेत. पण या व्हिडिओचा थोरात यांना फायदा कमी आणि तोटा जास्त झाला. या व्हिडिओमुळे जयश्रीताई ट्रोल होत होत्या हे कार्यकर्त्यांच्या आणि समर्थकांच्या लक्षात आले नाही हे विशेष. याहून सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अमोल खताळ यांना थोरात यांनी फारच हलक्यात घेतले. खताळ यांनी ग्राउंड वर राहून कामे केली होती. मात्र खताळ थोरात यांना पाडूच शकत नाहीत, हा ओव्हरकॉन्फिडन्स थोरात आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना नडला.