काळ बदलला पण वेळ तीचं आली….! बांगलादेशी हिंदू पुन्हा भूतकाळ आठवतोय; बांगला हिंदूंच्या वेदनादायक भूतकाळातील आठवणी

Tejas B Shelar
Updated:

Bangladesh News : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगात एकाच गोष्टीची चर्चा आहे. ती चर्चा आहे बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेची. नुकताच बांगलादेश पेटून उठला. यामुळे पुन्हा एकदा आशियाकडे जगाचे लक्ष वेधले गेले आहे. बांगलादेशात राजकीय उलथापालथ झाली आहे. शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत बांगलादेशातून पलायन केले आहे. दुसरीकडे अर्थतज्ज्ञ युनुस मोहम्मद यांच्या नेतृत्वाखाली तेथे अंतरिम सरकार स्थापन झालं आहे.

खरेतर बांगलादेशात घडलेली ही घटना जगासाठी नवखी नाही. या घटनेचे स्वरूप दुसरे असले तरी या घटनेने सध्या तिथे जे घडत आहे ते आधीही घडले आहे. भारत-पाकिस्तान फाळणी पासून बांगलादेशातील सामाजिक-राजकीय वातावरणात अनेकदा बदल झाले आहेत. मात्र तेथील या बदलाचा परिणाम पश्चिम बंगाल राज्यावर होत आला आहे. यामुळे भारताचे बांगलादेशवर विशेष लक्ष असते. फाळणीच्या आसपास अशा काही अराजक घटनांमुळे बांगलादेशातून लाखो लोक विस्थापित झालेत. 

या लोकांनी पश्चिम बंगाल, त्रिपुरा, आसाम आणि मेघालय यांसारख्या राज्यांमध्ये आश्रय घेतला. या राज्यांमध्ये अनेकजण त्यांचे जीवन पुन्हा उभारण्याच्या आशेने आले परंतु “निर्वासित” असे कायमचे लेबल त्यांना दिले गेले आहे. दरम्यान, आता अनेक वर्षांनी पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती होऊ पाहत आहे. बांगलादेशला पुन्हा एकदा अशांततेचा सामना करावा लागत आहे. पण या साऱ्या घटनांमुळे तेथील मायनॉरिटी समाज सर्वात जास्त प्रभावित होत आहे. 

खरे तर बांगलादेशात ही आग लागली ती आरक्षणाच्या मुद्द्यावरून. मात्र आता ही छोटीशी चिंगारी ज्वालामुखीचे रूप घेत आहे. आता आरक्षणापासून सुरू झालेला हा वाद हिंदू-मुस्लिमपर्यंत पोहचला आहे. बांगलादेशातील मायनॉरिटी समाज अर्थातच हिंदू समाज आता पुन्हा एकदा धोक्यात आला आहे. तेथील अल्पसंख्याक समुदायातील लोक असुरक्षिततेने ग्रासले आहेत. तेथील बांगला हिंदू शेजारच्या राष्ट्राकडे अल्पसंख्याकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आता आग्रह करत आहेत, त्यांच्या चिंता व्यक्त करतांना दिसत आहेत. याचा परिणाम हा आपल्या भारतातही पाहायला मिळतोय. केंद्रातील मोदी सरकारचे या सर्व घडामोडींकडे बारीक लक्ष आहे. 

स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे या घटनेकडे लक्ष ठेवून आहेत. पण, बांगलादेशातील या घटनेने पुन्हा एकदा वेदनादायक भूतकाळाच्या आठवणी जाग्या केल्या आहेत. अशा परिस्थितीत आज आपण भूतकाळातील बांगलादेशातील अत्याचारांचे साक्षीदार असलेल्या काही बांगला हिंदूंची मन की बात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भूतकाळात बांगलादेशी हिंदूंवर काय अत्याचार झालेत आणि सध्या बांगलादेशात जो घटनाक्रम सुरू आहे यावर त्यांना काय वाटते याविषयी आज आपण त्यांचे मत जाणून घेणार आहोत.

सुशील गंगोपाध्याय : सुशील गंगोपाध्याय 1971 मध्ये बांगलादेशमधून भारतात पळून आलेत. गंगोपाध्याय यांच्यासोबत सध्याच्या बांगलादेशातील अस्थिरतेबाबत आम्ही चर्चा केली. यावेळी त्यांनी बांगलादेशातील नोआखली जिल्ह्यातील त्यांच्या समृद्ध जीवनाची आठवण आम्हाला करून दिली. ते म्हणालेत की, आमच्याकडे एक मोठे कुटुंब आणि बरीच जमीन होती. पण मुक्तियुद्धादरम्यान, पाकिस्तानी सैन्य आणि रझाकारांनी आमच्यावर हल्ला केला. घरे जाळली गेली आणि अनेकांना क्रूरपणे ठार मारण्यात आले. स्वातंत्र्य मिळून थोडाचं काळ गेला  होता तो तेथील बहुसंख्य समुदायाने त्यांच्यावर पुन्हा त्याच्यावर सुरू केलेत. बहुसंख्य समुदायाच्या या शत्रुत्वामुळे त्यांना भारतात कायमचा आश्रय घ्यावा लागला. सध्या बांगलादेशात जी बिकट परिस्थिती आहे त्यावर देखील गंगोपाध्याय यांनी चिंता व्यक्त केली. तसेच यावर संतापही व्यक्त केला. गंगोपाध्याय यांनी म्हटल्याप्रमाणे “बांगलादेशात सध्या ज्या घटना घडतं आहेत ते पाहून हृदय पिळवटून जाते. मी गर्भवती महिलेच्या पोटात लाथ मारल्याचे फुटेज पाहिले; अशा प्रकारची क्रूरता अकल्पनीय आहे. एक भारतीय म्हणून, मी त्यांच्या सुटकेची मागणी करतो. तिथे हिंदूंशी असंच गैरवर्तन होत राहिले, त्यांच्यावर अत्याचार होत राहिले तर बांगलादेशातही ‘भारत छोडो’ आंदोलनाचा विचार करावा लागेलं असे त्यांनी यावेळी म्हटले. १९७१ च्या आठवणी आजही गंगोपाध्याय यांच्या मनात तशाच ताज्या आहेत. ते म्हणतात की, “मी फक्त 10-12 वर्षांचा होतो. रझाकारांनी आमच्यावर अत्याचार केलेत. पुरुषांचे मृतदेह नदीत फेकले आणि महिलांवर अत्याचार केले गेलेत. आमच्या अनेक महिलांना पाकिस्तानी सैनिकांनी गर्भवती केले. आज इतक्या दशकानंतरही त्या जखमा तशाच कायम आहेत.”

अनिमा दास : अनिमा दास यांनीही बांगलादेशातून भारतात आसरा घेतला आहे. बनगावच्या अनिमा दासची कहाणी सुद्धा मनाला चटके देणारी आहे. अनिमा दास जेव्हा बांगलादेशातून पळून भारतात आल्यात तेव्हा त्या गर्भवती होत्या. तो काळ त्यांच्यासाठी खूपच त्रासदायक राहिला. त्या त्रासदायक दिवसांची आठवण करून देताना त्या म्हणाल्यात की, “तेव्हा माझा मुलगा तरुण होता आणि माझी मुलगी माझ्या पोटात होती. देश संघर्षात बुडाला होता; घरे जाळली जात होती. भीतीपोटी माझ्या सासरच्यांनी आम्हाला भारतात पाठवले.” त्यांनी त्यांच्या उघड्या डोळ्याने बांगलादेशातील हा व्यापक हिंसाचार पाहिला आहे. यामुळे या घटनेने त्यांच्या मनावर मोठा आघात झाला आहे. त्या म्हणतात की, “मी त्यानंतर बांगलादेशला भेट दिली आहे, परंतु तेथे पुन्हा राहण्याचा विचार मला सहन होत नाही.”

सीमावर्ती भागातील अनेकांनी अशाच भावना व्यक्त केल्या. त्यावेळी अनेकांनी आपली वडिलोपार्जित घरे आणि आठवणी सोडून धार्मिक छळातून तेथून पळ काढला होता. विस्थापनाची मूळ वेदना या लोकांच्या मनात कायम सळत राहणार आहे. आपलं सारं काही सोडून दुसऱ्या ठिकाणी येणं, तेथे स्वतःला स्टेबल करणं सोपं नाही. पण ही संपूर्ण मंडळी भारताने देऊ केलेल्या सुरक्षिततेबद्दल आभारी आहे अन त्यांच्या मनात कृतज्ञतेची भावना देखील आहे. या विस्थापित लोकांनी बांगलादेशातील हिंदूंना भारतात आश्रय घ्या असा सल्लाही यावेळी दिला आहे.

हरधन बिस्वास : हरधन बिस्वास यांचा परिवार देखील धार्मिक छळाला बळी पडला होता. यामुळे त्यांचे वडील बांगलादेशातून स्थलांतरित झाले आहेत. ते म्हणालेत की छळाच्या चक्रीय स्वरूपामुळे हिंदू समुदाय तिथे सतत भीतीमध्ये राहतो, अनेकांना त्यांच्या मायदेशातून पळून जाऊन भारतात आश्रय घेण्यास भाग पाडले जाते. “बांगलादेशात स्वातंत्र्याच्या काळापासून ते मुक्तिसंग्रामापर्यंत आणि पुढेही हिंदूंनी खूप मोठ्या आव्हानांचा सामना केला आहे. पण, अनेकांनी वारंवार येणा-या या अशा धोक्यांचा सामना करूनही तिथे राहणे पसंत केले.”

परेश दास : परेश दास यांनाही बांगलादेशात असाच दुःखद आणि त्रासदायक अनुभव आला आहे. बांगलादेशी हिंदू वर होत असलेल्या अत्याचाराला कंटाळून 1956 मध्ये दास भारतात आलेत. ते म्हणतात की, “माझ्या आजोबांची माझ्या डोळ्यासमोर हत्या करण्यात आली. आम्ही भीतीपोटी आमची जमीन सोडून दिली. त्यांनी माझ्या समोरच माझ्या चुलत भावावर प्राणघातक हल्ला केला. आम्ही सध्या भारतात शांततेत राहत असलो, तरी नोआखलीतील नातेवाईकांना अजूनही धमक्यांचा सामना करावा लागत आहे. अवघ्या महिन्याभरापूर्वी जमिनीच्या वादातून माझ्या काकांची हत्या झाली होती, तेव्हा मी त्यांना मालमत्तेपेक्षा त्यांच्या जीवनाला प्राधान्य देण्यास सांगितले होते.”

रशोमोय बिस्वास : रशोमोय बिस्वास यांनाही इतर हिंदूंप्रमाणेच बांगलादेशात त्रास सहन करावा लागला होता. आम्ही त्यांच्यासोबतही चर्चा केली. यावेळी न्यूटाऊनजवळ राहणारे रशोमोय बिस्वास यांनी 1971 नंतरच्या छळांची आठवण करून दिली. ते म्हणतात की, “तिथे हिंदू असणे हा गुन्हा होता. स्वातंत्र्यानंतरही दिलासा मिळाला नाही. पाकिस्तानी लष्कर आणि जमातच्या सैन्याने आम्हाला लक्ष्य केले, हिंदूंच्या घरांवर हल्ले केले.” ते म्हणालेत की, ”माझ्या कुटुंबाने कित्येक रात्री लपून काढल्यात. कित्येकदा उपाशी राहावे लागले. पण, आम्ही आता भारतात शांततेत राहतोय. मात्र आजही आमचे बरेच नातेवाईक बांगलादेशात राहतात. यामुळे आम्ही भारत सरकारला तेथील हिंदू निर्भयपणे जगू शकतील याची खात्री करण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती करतो.”

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe