Banking News : आरबीआयच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांमध्ये देशातील अनेक बँकांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. काही बँकांवर दंडात्मक कारवाई झाली आहे तर काही बँकांचे थेट लायसन्स रद्द करण्याचा मोठा निर्णय आरबीआयकडून घेण्यात आला आहे. अशातच आरबीआयने आणखी एक मोठा निर्णय घेतला असून देशातील दोन वित्तीय संस्थांचे लायसन्स रद्द झाले आहे.
तर तीन सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामुळे संबंधित बँकेतील आणि वित्तीय संस्थेमधील ग्राहकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. दरम्यान आता आपण आरबीआयने कोणत्या पाच बँकांवर कारवाई केली आहे या संदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
भारतीय रिझर्व्ह बँकेने तीन सहकारी बँकांवर आर्थिक दंड ठोठावला आहे आणि दोन बिगर बँकिंग फायनान्स कंपन्यांचे म्हणजे NBFC चे नोंदणी प्रमाणपत्र (CoR) रद्द केले आहे. सेंट्रल बँकेने अर्थातच आरबीआयने यासंदर्भात एक प्रसिद्धीपत्रक सुद्धा जारी केले आहे.
या प्रसिद्धी पत्रकात कोणत्या बँकांवर कोणती कारवाई झाली आहे याबाबत सविस्तर माहिती आहे. मध्यवर्ती बँकेने म्हटल्याप्रमाणे, गुजरातस्थित द खेडा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (खेडा), कपडवंज पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (खेडा) आणि लुणावडा नागरीक सहकारी बँक लिमिटेडवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
तर उल्हास सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड (गांधीनगर, गुजरात) आणि सीकर इन्व्हेस्टमेंट को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (भरतपूर शहर, राजस्थान) यांचे थेट परवाने रद्द करण्यात आले आहेत. म्हणजे ज्या कंपन्यांचे परवाने रद्द झाले आहेत त्या कंपन्यांना आता NBFC म्हणून व्यवसाय करण्याची परवानगी राहणार नाही.
या बँकांवर झाली दंडात्मक कारवाई
आरबीआयने लुणावडा नागरी सहकारी बँक लिमिटेडला 2.10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. बँक तिच्या कर्जदारांची क्रेडिट माहिती CIC ला सादर करण्यात अयशस्वी ठरली. रिझर्व्ह बँकेच्या पूर्वपरवानगीशिवाय ऑन-साइट ऑटोमॅटिक टेलर मशीन (एटीएम) उघडले. त्याच्या ग्राहकांच्या KYC चे जोखीम आधारित अपडेट करण्यात आणि विहित कालावधीनुसार खात्यांच्या जोखीम वर्गीकरणाचे पुनरावलोकन करण्यात अयशस्वी झाली यामुळे या बँकेवर आरबीआय कडून दंडात्मक कारवाई झाली आहे.
खेडा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला 2.10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. प्रुडेंशियल इंटरबँक काउंटरपार्टी एक्सपोजर मर्यादांचे पालन करण्यात बँक अयशस्वी झाली. या व्यतिरिक्त, 2022-23 या आर्थिक वर्षासाठी पीएसएल निर्धारित वेळेत SIDBI कडे ठेवलेल्या MSC पुनर्वित्त अभ्यासक्रमात निर्धारित रक्कम जमा करू शकले नाही. यामुळे या बँकेवर दंडात्मक कारवाई झाली.
शिवाय, आरबीआयने कपडवंज पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला 3 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. बँकेने चालू खात्याव्यतिरिक्त इतर खात्यांमध्ये व्याजमुक्त ठेवी स्वीकारल्या. ज्यांच्या उत्पन्नाला आयकर भरण्यात सूट देण्यात आली नाही अशा संस्थांची बचत खाती उघडली. KYC अपडेट करण्यात अयशस्वी आणि विहित कालावधीनुसार जोखीम खात्यांसाठी वर्गीकरणाचे पुनरावलोकन करण्यात अयशस्वी झाली म्हणून या बँकेला लाखो रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की ज्या बँकांवर दंडात्मक कारवाई झाली आहे त्या बँकेतील ग्राहकांवर कोणताच विपरीत परिणाम होणार नाही. बँकेला ठोठावण्यात आलेला दंड हा बँकेकडून वसूल होणार असून ग्राहकांकडून पैसे वसूल केले जाणार नाहीत. यामुळे ग्राहकांनी कोणतीचं चिंता करू नये असे आवाहन यावेळी तज्ञ लोकांकडून करण्यात आले आहे.