Banking News : गेल्या काही महिन्यांमध्ये रिझर्व बँक ऑफ इंडिया ने बँकिंग सेक्टर साठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. आरबीआयची देशातील खाजगी तसेच सरकारी बँकांवर करडी नजर असते. ज्या बँका आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन करतात त्यांच्यावर आरबीआयकडून कारवाई देखील होत असते.
गेल्या काही महिन्यांमध्ये देशातील अनेक बँकांवर आरबीआयने दंडात्मक कारवाई केली आहे आणि काही बँकांचे लायसन्स देखील रद्द करण्यात आले आहेत. अशातच आता आरबीआय ने एक मोठा निर्णय घेतलाय. आरबीआयच्या सदर निर्णयामुळे देशातील दोन बड्या बँका आता विलीन होणार आहेत.
तसेच आरबीआयने यातील एका बँकेवर लाखो रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने कॉसमॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (महाराष्ट्र) सह नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक लि. बंगळुरूच्या विलीनीकरण योजनेला नुकतीच परवानगी दिली आहे.
RBI च्या प्रसिद्धीपत्रकानुसार ही योजना 6 जानेवारी 2025 पासून लागू होईल. म्हणजेच येत्या दोन दिवसात आरबीआयच्या या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. यामुळे जर तुमचही या बँकेत अकाउंट असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची ठरणार आहे.
आरबीआयने याबाबत एक प्रसिद्ध पत्रक काढले असून या पत्रकानुसार, बँकिंग नियमन कायदा, 1949 अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून ही योजना मंजूर करण्यात आली आहे.
आरबीआयच्या या निर्णयामुळे आता 06 जानेवारीपासून, द नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक लि., बंगलोर (कर्नाटक) च्या शाखा कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (महाराष्ट्र) च्या शाखा म्हणून काम करणार आहेत. दरम्यान, कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयने दंडात्मक कारवाई सुद्धा केलेली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने, 31 डिसेंबर 2024 रोजीच्या आदेशाद्वारे, कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लि. सदर बँकेला ₹8.30 लाखाचा आर्थिक दंड ठोठावला आहे. काही नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या बँकेवर हा दंड ठोठावण्यात आला आहे.