अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-सरकारने 4 बँकांची निवड खासगी करण्यासाठी केली आहे. यापैकी तीन बँका लहान आणि एक मोठी बँक आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसीज बँक आणि सेंट्रल बँक लहान आहेत, तर बँक ऑफ इंडिया ही एक मोठी बँक आहे. जाणून घ्या याविषयी सविस्तर…
सरकार हे पाऊल का उचलत आहे? :- सरकार देशात सार्वजनिक क्षेत्रातील काही मोजक्या मोठ्या बँका चालविण्याच्या बाजूने आहे. उदा.स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँक. पूर्वी एकूण 23 सरकारी बँका होत्या. यापैकी अनेक लहान बँका यापूर्वीच मोठ्या बँकेत विलीन झाल्या आहेत. यावेळी सरकारने अर्थसंकल्पात दोन बँकांमध्ये भागभांडवल विक्री करण्याचे सांगितले होते. मात्र, चार बँकांची नावे समोर आली आहेत.
खातेदारांचे काय होईल? :- या 4 बँकांमध्ये खातेदारांच्या पैशांना कोणताही धोका नाही. खातेदारांना याचा फायदा असा होईल की खासगीकरणानंतर त्यांना ठेवी, कर्ज यासारख्या बँकिंग सेवा पूर्वीपेक्षा चांगली मिळू शकेल. एक धोका असा आहे की काही प्रकरणांमध्ये त्यांना जास्त शुल्क भरावा लागेल. उदाहरणार्थ, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या बचत खात्यात किमान एक हजार रुपयांचा बॅलन्स ठेवावा लागतो तर काही खासगी बँकांमध्ये किमान शिल्लक रक्कम 10 हजार रुपयांपर्यंत जाते.
कर्मचार्यांचे काय होईल? :- विद्यमान सरकारने आधीच सांगितले आहे की बँकांचे विलीनीकरण किंवा खासगीकरण झाल्यास कर्मचार्यांच्या नोकऱ्या जाणार नाहीत. बँक ऑफ इंडियामध्ये 50 हजार कर्मचारी आहेत, तर सेंट्रल बँकेत 33 हजार कर्मचारी आहेत. इंडियन ओव्हरसीज बँकेत 26 हजार कर्मचारी आणि बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 13 हजार कर्मचारी आहेत. अशा प्रकारे सार्वजनिक क्षेत्रातील या चार बँकांमध्ये एक लाखाहून अधिक कर्मचारी आहेत.
खाजगीकरण होणाऱ्या बँकांची मार्केटकॅप किती आहे? :- बँक ऑफ इंडिया ही देशातील सहाव्या क्रमांकाची बँक असून सेंट्रल बँक सातव्या क्रमांकावर आहे. त्यांच्या पाठोपाठ इंडियन ओव्हरसीज आणि बँक ऑफ महाराष्ट्रचा क्रमांक लागतो. बँक ऑफ इंडियाचे मार्केट कॅपिटलायझेशन 19 हजार 268 कोटी आहे, तर इंडियन ओव्हरसीज बँकेची मार्केट कॅप 18 हजार कोटी, बँक ऑफ महाराष्ट्रची 10 हजार 443 कोटी आणि सेंट्रल बँकेची 8 हजार 190 कोटी आहे.