BJP Manifesto : सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार वातावरण निर्मिती करत आहेत. खरे तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रात विधानसभेची निवडणुक होत आहे आणि यामुळे ही विधानसभा निवडणूक विशेष लक्षवेधी ठरत आहे. कधीकाळी सोबत खुर्चीला खुर्ची लावून बसणारे आता विरोधात शड्डू ठोकत आहेत.
दरम्यान, महायुती आणि महाविकास आघाडी मधील घटक पक्षांच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकांसाठी जाहीरनामा देखील प्रसिद्ध होत आहे. भारतीय जनता पक्षाने देखील या निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून हा जाहीरनामा सध्या चर्चेचा विषय आहे. भारतीय जनता पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात सर्वसामान्यांसाठी शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या असून हा जाहीरनामा या निवडणुकीत गेम चेंजर ठरणार असा दावा केला जात आहे.
महाराष्ट्रातील गाव खेड्यातील अगदी तळागाळातील माणसाचा विचार करून हा जाहीरनामा तयार करण्यात आला असून तळागाळातील माणसाची प्रगतीची काळजी घेणारा हा जाहीरनामा आहे असा दावा भारतीय जनता पक्षाने केला आहे. भारतीय जनता पक्षाने यामध्ये गोरगरिबाच्या कल्याणासाठी अनेक घोषणा केल्या असून आज आपण भारतीय जनता पक्षाचा हाच जाहीरनामा अगदी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा
शेतीचा व्यवसाय मोठा आव्हानात्मक असतो. मातीत पेरलेलं उगवेलच याची शाश्वती नसते. मात्र तरीही शेतकरी राजा मेहनत घेतो. जगाचे पोट भरतो. दरम्यान याच बळीराजाला केंद्रस्थानी ठेवून बीजेपीने एक मोठी घोषणा केलीये. शेतीसाठी आवश्यक खतांवरील राज्य आणि वस्तू सेवा कर सवलत देण्याचे आणि सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार रुपये हमीभाव देण्याचे आश्वासन भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे.
सोबतच किसान सन्मान योजना अंतर्गत प्रत्येक शेतकरी बांधवाला सध्याच्या प्रतिवर्षी 12 हजार रुपये ऐवजी पंधरा हजार रुपये देण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. 45 हजार गावांमध्ये पाणंद रस्ते बांधणार असे भाजपाने म्हटले आहे म्हणून ग्रामीण भागातील दळणवळण सुविधा आणखी सक्षम होणार असून याचा सर्वाधिक फायदा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना होणार आहे. यानिमित्ताने शेतकऱ्यांची मोठी अडचण दूर होईल असे म्हटले जात आहे.
तसेच पुढील तीन वर्षात 50 लाख महिलांना लखपती दीदी बनवण्यासाठी 500 बचत गटांकरिता 1000 कोटींचा फिरता निधी भाजप उपलब्ध करून देणार असेही यात म्हटले आहे. अक्षय अन्न योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबांना मोफत अन्नधान्य, त्याबरोबरच महारथी आणि अटल टिंकरीग लॅब योजनेच्या माध्यमातून सर्व शासकीय शाळांमध्ये रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेतला जाईल अशी ग्वाही भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात दिली आहे.
लाडक्या बहिणींना वाढीव निधी मिळणार
शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना याचा लाभ मिळत असून सध्या या योजनेची संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा आहे. विशेष म्हणजे आत्तापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पाच महिन्यांचे साडेसात हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा सुद्धा करण्यात आले आहेत.
जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्याचे पैसे जमा झाले असून डिसेंबर महिन्याचे पैसे सुद्धा नोव्हेंबर महिन्यातच महिलांच्या खात्यात जमा करू असे सरकारने म्हटले आहे. दरम्यान भारतीय जनता पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात लाडकी बहिणी योजनेअंतर्गत दिले जाणारे पंधराशे रुपये आता वाढवून देऊ असे आश्वासन दिलय.
लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये ऐवजी 2100 रुपये दिले जातील असे भाजपाने सांगितले आहे. प्रत्येक गरिब व्यक्तीचे स्वप्न आम्ही पूर्ण करू, असे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. यात वृद्ध पेन्शन धारकांना दर महिन्याला 2100 रुपये देण्याचे आश्वासन अन राज्यात जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवण्याचा वादा भाजपाने केला आहे.
विद्यार्थ्यांना दरमहा दहा हजार रुपये मिळणार
महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार आले तर तब्बल दहा लाख विद्यार्थ्यांना दरमहा दहा हजार रुपये देऊ असे वचन भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. अंगणवाडी आणि आशा सेविकांना दर महिन्याला पंधरा हजार रुपये, सर्वसामान्य नागरिकांना वीजबिलात 30 टक्के सवलत, सौर उर्जेवर भर दिला जाईल असे भाजपाने यात म्हटले आहे.
निवडणुकीनंतर पुन्हा महायुतीचे सरकार आले की शंभर दिवसात “व्हिजन महाराष्ट्र 2029” सादर करू, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला एक ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था बनवू असे आश्वासन देखील भाजपाने दिलय. मेक इन महाराष्ट्रच्या अंतर्गत आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून नागपूर, पुणे, नाशिक आणि अशी शहरे एका धाग्यात बांधण्याचा प्रयत्न असून याअंतर्गत नागपूर, पुणे आणि नाशिक या ठिकाणी एरोस्पेस हब बनवण्याचा आमचा मानस आहे, असे भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रात उद्योजक तयार करणार !
महाराष्ट्रात कौशल्य जनगणना, उद्योगांच्या गरजेच्या अनुसार कुशल मनुष्यबळ निर्मिती करण्याचे आश्वासन, प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र स्थापन करून दहा लाख उद्योजक घडविण्याचे आश्वासन देखील या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा!
भाजपाच्या जाहीरनाम्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कांकडेही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. राज्यातील ओबीसी, ई बी सी, एससी तसेच इ डब्ल्यू एस आणि व्हीजेएनटी कॅटेगिरीमधील विद्यार्थ्यांना भाजपाने मोठी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षण आणि परीक्षा शुल्कातून संपूर्णपणे प्रतिवृती सवलत देण्याचे आश्वासन भाजपाने दिले आहे.
ज्येष्ठ नागरिकांना मिळणार मोठा लाभ!
भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात सर्वच घटकांचा विचार केलाय. वयोवृद्ध नागरिकांसाठी ही भाजप प्रयत्नशील असून युवकांसाठीही मोठमोठ्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील युवकांना स्वामी विवेकानंद युवा स्वास्थ्य कार्ड आणि वार्षिक आरोग्य तपासणी, राज्यातील गौरवशाली किल्ल्यांचे संवर्धन करू असे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी प्राधान्य धोरण, आधार सक्षम सेवा तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये स्वतंत्र बाह्य रुग्णसेवा देऊ अशी गॅरंटी भाजपाने दिली आहे.
धर्माचे रक्षण करणार!
भाजपाने आपल्या जाहीरनामात धर्माचे रक्षण करणार असे म्हटले आहे. सक्तीच्या धर्मांतरांविरोधात कायदा करण्याचे आणि फसव्या धर्मांतराला आळा घालण्याचे आश्वासन भाजपाने दिले आहे. एकंदरीत भारतीय जनता पक्षाचा हा जाहीरनामा समाजातील सर्वच घटकांना डोळ्यापुढे ठेवून सादर करण्यात आला असून हा जाहीरनामा यंदाच्या निवडणुकीत गेम चेंजर ठरेल असे दिसते. त्यामुळे येत्या 23 तारखेला कोणाच्या जाहीरनाम्यावर जनता अधिक विश्वास दाखवते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.