India News : रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेची तुमच्या-माझ्यासह जगाला उत्सुकता आहे, असे सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील तीर्थस्थळांवर १४ ते २२ जानेवारीपर्यंत स्वच्छता मोहीम राबवण्याचे आणि रामलल्लाच्या प्रतिष्ठापना दिनी अर्थात २२ जानेवारी रोजी ‘श्रीराम ज्योती’ नावाने एक विशेष दिवा प्रज्वलित करून दीपावली साजरी करण्याचे आवाहन देशवासीयांना केले.
शनिवारी अयोध्येत पहिले विमानतळ, नवे रेल्वे स्थानक, ८ नव्या रेल्वे गाड्यांचे लोकार्पण करतानाच सुमारे १७ हजार कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजनानंतर सभेत ते बोलत होते.
यावेळी मोदींनी अयोध्येचे गतवैभव व विकासकार्यांचा उल्लेख करत विकास व वारशाची संयुक्त शक्ती एकविसाव्या शतकात भारताला जगात अग्रेसर करील, असा विश्वास व्यक्त केला.
येत्या २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी शनिवारी मोदींनी अयोध्येचा दौरा केला. यावेळी एका सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, आज पार पडलेले उद्घाटन सोहळे विकासाची भव्यता दाखवत आहेत.
काही दिवसांनंतर अयोध्येत वारशाची भव्यता व दिव्यता दिसेल. विकासाची नवी उंची गाठताना वारशाचेही जतन करावे लागते. आज भारत आपल्या तीर्थक्षेत्रांचा पुनर्विकास करत आहे.
त्याचवेळी डिजिटल तंत्रज्ञानाच्या जगातही ठसा उमटवत आहे. आपण सूर्य, चंद्रावर झेप घेत समुद्राची खोली मोजत आहोत. त्याचवेळी आपल्या पुरातन मूर्ती देखील परदेशातून परत आणत आहोत. आज अयोध्येत प्रगतीचा उत्सव आहे.
२२ जानेवारीला अयोध्येत न येण्याचे आवाहन
पंतप्रधानांनी सुरक्षा व प्रशासकीय यंत्रणेवर पडणारा ताण पाहता देशवासीयांना २२ जानेवारी रोजी अयोध्येत येऊ नका, असे आवाहन केले. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे साक्षीदार होण्याची प्रत्येकाची इच्छा आहे, परंतु ते शक्य नाही.
त्यामुळे माझी सर्व रामभक्तांना हात जोडून विनंती आहे की, २२ जानेवारीला अयोध्येत येण्याचे नियोजन करू नका. प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा व्यवस्थित पार पडू द्या. ५५० वर्षे वाट पाहिली अजून काही दिवस थांबा.
२२ जानेवारीनंतर तुम्ही तुमच्या सोयीनुसार अयोध्येत या. प्रभू श्रीराम आणि अयोध्येतील त्यांचे भव्यदिव्य मंदिर २३ जानेवारीपासून अनंतकाळापर्यंत दर्शनासाठी उपलब्ध आहे. प्रभू रामचंद्रांना त्रास होईल, असे वर्तन आपण करणे योग्य नाही, असे मोदी म्हणाले.