CNG Price Hike : सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. खरे तर गेल्या काही वर्षांपासून वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता अक्षरशः बेजार झाली आहे. कांदा लसूण खाद्यतेलाच्या वाढत्या किमतींमुळे आधीच संकटात सापडलेल्या सर्वसामान्यांना आता आणखी एक फटका बसणार आहे. सीएनजी च्या किमती वाढवल्या गेल्या आहेत.
यामुळे सीएनजी वाहन चालकांना याचा मोठा फटका बसणार आहे. खरंतर पेट्रोल डिझेलच्या किमतीमुळे त्रस्त झालेली बहुतांशी जनता सीएनजी वाहनांकडे वळली होती. अनेकांनी फक्त आणि फक्त पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढत असल्याने सीएनजी वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय.
पण आता सीएनजी च्या किमती देखील वाढल्या असल्याने सर्वसामान्यांची कोंडी होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महानगर गॅस लिमिटेडने (MGL) CNG च्या दरात आज पासून वाढ केली आहे.
सीएनजी चे दर प्रति किलो २ रुपयांनी वाढवण्याचा मोठा निर्णय महानगर गॅस लिमिटेड ने घेतला असून हे नवीन दर आज पासून प्रभावी होणार आहेत. साहजिकच, या भाववाढीमुळे सर्वसामान्यांचे हाल होणार आहेत.
महागाईने होरपळलेली जनता पुन्हा एकदा त्रस्त होणार आहे. महानगर गॅस लिमिटेड ने घेतलेल्या या निर्णयामुळे मुंबई आणि परिसरात सीएनजीच्या किमती 77 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचल्या आहेत.
घरगुती गॅस वाटप कमी करण्याचा निर्णय सरकारकडून नुकताच घेण्यात आला आणि त्यानंतर कंपनीने सीएनजीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. सरकारने शहर गॅस वितरण कंपन्यांसाठी प्रशासकीय किंमत यंत्रणा (APM) गॅस वाटप २०% ने कमी केले आहे.
सलग दुसऱ्या महिन्यात ही कपात करण्यात आली आहे. या पाऊलामुळे एमजीएल आणि आयजीएलसारख्या कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
सध्या सीएनजीच्या किमती फक्त 2.6% ने वाढवण्यात आले आहेत मात्र भविष्यात या किमती आणखी वाढवल्या जातील. भविष्यात या किमती तब्बल आठ ते दहा टक्क्यांनी वाढवाव्या लागतील असा दावा केला जातोय.
दरम्यान महानगर गॅस लिमिटेड ने सीएनजी च्या किमती वाढवल्यानंतर आता इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड सुद्धा सीएनजी च्या किमती वाढवणार असल्याची बातमी समोर येत आहे. यामुळे रिक्षाचा आणि टॅक्सीचा प्रवास महागणार आहे. तसेच जे लोक सीएनजी कार चालवतात त्यांच्याही खर्चात यामुळे वाढ होणार आहे.