Cotton Farming : कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. या पिकाची राज्यभर लागवड केली जाते. उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात कापसाची लागवड पाहायला मिळते. मात्र गेल्या दोन-तीन वर्षांपासून कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत आहेत. कापसाला बाजारात अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी बांधवांना हे पीक परवडत नाहीये.
दरम्यान या चालू हंगामातील कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी कापूस वेचणी सुरु होऊन बाजारात मालाची विक्री देखील सुरू झाली आहे. नवीन कापसाला बाजारात सव्वा सात हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत आहे. मात्र अजूनही नवीन कापसाची बाजारात अपेक्षित आवक नाहीये.
विजयादशमीपासून मात्र कापसाची आवक वाढणार आहे. दरवर्षी विजयादशमीच्या काळात कापसाची आवक वाढत असते. यंदाही याच काळात नवीन कापसाची बाजारात आवक वाढणार आहे. तत्पूर्वी मात्र महाराष्ट्रातील कापूस उत्पादकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, शेतकऱ्यांकडील कापूस दिवाळीपूर्वीच खरेदी केला जावा आणि खरेदी केल्यानंतर सात दिवसांच्या आत चुकारा मिळावा यासाठी ग्राहक पंचायतचे जिल्हा संघटक (ग्रामीण) श्रीराम सातपुते यांनी जनहित याचिका दाखल केली होती.
याच जनहित याचिकेवर माननीय न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी भारतीय कापूस महामंडळाने उच्च न्यायालयात प्रत्यक्षात सरकारी कापूस खरेदी केंद्र कधी सुरू होणार याची माहिती दिली. महामंडळाने सांगितल्याप्रमाणे यंदा एक ऑक्टोबर पासून महाराष्ट्रात कापूस खरेदी केंद्र सुरू केली जाणार आहेत.
राज्यात जवळपास 110 कापूस खरेदी केंद्र सुरू केली जाणार अशी माहिती महामंडळाने यावेळी दिली आहे. त्यानंतर न्यायालयाने ही माहिती रेकॉर्डवर घेऊन या प्रकरणावर पुढील सुनावणी पुढल्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर मध्ये होणार असे जाहीर केले.
पुढील सुनावणी १४ ऑक्टोबर रोजी निश्चित करण्यात आली आहे. तसेच, पुढील सुनावणी वेळी कापूस खरेदी केंद्रांसंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश महामंडळाला देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांकडून दरवर्षी राज्यातील कापूस खरेदी केंद्रे जाणीवपूर्वक विलंबाने सुरू केली जातात. त्यामुळे खासगी व्यावसायिक फायदा उचलतात.
असा आरोप केला जात आहे. यामुळे आता या प्रकरणात उच्च न्यायालय काय आदेश देते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. तथापि महामंडळाने पुढील महिन्यात कापूस खरेदी सुरू करण्याचे आश्वासन दिले असल्याने खरच पुढल्या महिन्यात कापसाचे खरेदी केंद्र सुरू होणार का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.