Cotton News : कापसाचा हंगाम सुरू होऊन जवळपास सहा ते सात महिन्यांचा कालावधी उलटला आहे. सहा ते सात महिन्यांपासून शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक करून ठेवली आहे. गत हंगामात कापसाला चांगला विक्रमी दर मिळाला असल्याने शेतकऱ्यांनी याही हंगामात कापसाला चांगला भाव मिळेल यामुळे कापसाची साठवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रमुख कापूस उत्पादक जिल्ह्यात बहुतांशी शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक केली आहे. सध्या कापसाला आठ हजार रुपये प्रतिक्विंटल च्या आसपास दर मिळत असून यामध्ये वाढ होईल या आशेने शेतकऱ्यांनी कापसाचे घरात, शेडमध्ये साठवणूक करून ठेवली आहे. पण आता साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांना एका भलत्याच संकटामुळे अडचणीचा सामना करावा लागत आहे.
खरं पाहता सहा ते सात महिने कापूस साठवून ठेवल्यामुळे कापसात आता वेगवेगळ्या कीटकांचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे शेतकरी व शेतकरी कुटुंब अडचणीत आले आहे. कापसात प्रादुर्भाव झालेल्या या कीटकांमुळे शेतकऱ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. कापसात गुलाबी बोंड अळी आणि पिसवा यांसारख्या कीटकांचा प्रादुर्भाव आहे. गुलाबी बोंड आळी मुळे जरी आरोग्यावर काही विपरीत परिणाम होत नसला तरी देखील यामुळे कापसाचा दर्जा खालावत आहे. तर पिसवा या कीटकामुळे शेतकऱ्यांना त्वचा विकाराचा सामना करावा लागत आहे.
अंगावर पुरळ येणे खाज सुटणे यांसारख्या समस्या यामुळे तयार होत आहेत. परिणामी आता कापसावर कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे. पण याहीमुळे शेतकऱ्यांच्या आरोग्याला धोका आहे. यामुळे आगीतून सुटणे आणि राखेत पडणे अशी गत शेतकऱ्यांची होत आहे. खरं पाहता हंगामाच्या सुरुवातीला कापूस दहा ते अकरा हजार रुपये प्रतिक्विंटल दरम्यान विक्री होत होता. परंतु हा दर अधिक काळ टिकू शकला नाही. नोव्हेंबर नंतर प्रामुख्याने कापूस दरात घसरण पाहायला मिळाली. डिसेंबर मध्ये मात्र साडेसात हजार रुपये प्रति क्विंटलचा दर कापसाला मिळत होता.
जानेवारी महिन्यात यामध्ये थोडीशी सुधारणा झाली आणि अकोट सारख्या बाजारात कापसाला 9000 पर्यंतचा दर मिळू लागला. मात्र हा दर पण अधिक काळ टिकू शकला नाही आणि सध्या स्थितीला 7500 ते 8000 दरम्यानच कापसाला भाव मिळत आहे. एकंदरीत दरवाढीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी कापूस साठवणुकीचा निर्णय घेतला आहे. पण आता कापसामध्ये होत असलेल्या कीटकांच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याने कापूस साठवणुकीसाठी शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत.
तर बाजारात सध्या मिळत असलेल्या दरात कापसाची विक्री केली तर उत्पादन खर्च देखील भरून निघणार नाही यामुळे विक्री देखील करता येत नाहीये. अशा परिस्थितीत कापूस उत्पादक दुहेरी कोंडीत सापडला असल्याचे चित्र संपूर्ण राज्यभर पाहायला मिळत आहे. यामुळे दर वाढीसाठी शासनाने काहीतरी ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत अशी मागणी कापूस उत्पादकांकडून यावेळी केले जात आहे.