Cricket Team India Schedule : भारतातील क्रिकेट प्रेमींसाठी आजची ही बातमी खूपच महत्त्वाची ठरणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये सुरु असलेली पाच सामन्यांची कसोटी मालिका नुकतीच संपली आहे. या कसोटी मालिकेत भारताने जबरदस्त कामगिरी केली आहे. भारताने इंग्लंडला कसोटी मालिकेत 4-1 ने पराभूत केले आहे.
भारताच्या या दमदार कामगिरीमुळे आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये टीम इंडिया टॉपवर पोहचली आहे. या अभूतपूर्व विजयानंतर भारताची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठीच्या फायनलची दावेदारी आणखी मजबूत झाली आहे. दरम्यान आता चित्तथरारक कसोटी मालिकेनंतर टीम इंडियामधील अनेक खेळाडू आयपीएल खेळणार आहेत.
आयपीएल झाल्यानंतर टीम इंडिया पुन्हा एकदा एकत्रितरित्या टी-20 वर्ल्ड कप खेळणार आहे. दरम्यान आता आपण आयपीएल मग टी ट्वेंटी विश्वचषक आणि त्यानंतर टीम इंडियाचे वेळापत्रक कसे राहणार ? याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
कसं आहे आयपीएलच वेळापत्रक ?
आयपीएलचा अर्थातच इंडियन प्रीमियर लीगचा 17 वा हंगाम लवकरच थाटामाटात सुरू होणार आहे. यामध्ये टीम इंडियाचे अनेक धुरंदर खेळाडू खेळणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 22 मार्च 2024 पासून आयपीएल 17 वा हंगाम सुरू होणार आहे.
हा आयपीएलचा हंगाम जवळपास दोन महिने सुरू राहणार आहे. आयपीएलचा शेवटचा सामना 21 मे ला खेळवला जाणार आहे. आयपीएलच्या वेळापत्रकाप्रमाणे या सीझनमध्ये एकूण 72 सामने होणार आहेत. यातील साखळी फेरीत प्रत्येक संघ 14 सामने खेळणार आहे.
कसं राहणार टी-20 विश्वचषकाचे वेळापत्रक
आयपीएल झाल्यानंतर एका आठवड्यात लगेच टी-20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. टी ट्वेंटी विश्वचषक हा जवळपास एक महिना सूरु राहील. एक जून ते 29 जून 2024 दरम्यान टी-20 विश्वचषक सुरु राहील.
यंदाचा टी-20 विश्वचषक हा अमेरिका आणि वेस्टइंडीज मध्ये पार पडणार आहे. या विश्वचषकाचा भारताचा पहिला सामना 5 जून 2024 ला रंगणार आहे. आता आपण टी-20 विश्वचषकानंतर भारतीय संघाचे वेळापत्रक कसे राहणार हे थोडक्यात समजून घेणार आहोत.
टी-20 विश्वचषकानंतर टीम इंडियाचे वेळापत्रक कसे राहणार ?
विश्वचषक झाल्यानंतर टीम इंडिया झिम्बाब्वे विरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. ही पाच सामन्यांची मालिका राहणार आहे. 6 जुलैला ही मालिका सुरू होईल आणि 14 जुलैला ही मालिका संपणार आहे. यानंतर मग टीम इंडिया श्रीलंका विरुद्ध टी-20 आणि वनडे मालिका खेळणार आहे. जुलै-ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या या मालिकेत 3 वनडे आणि 3 टी-20 सामने खेळवले जाणार आहेत.
यानंतर मग सप्टेंबर महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारत बांगलादेश विरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ऑक्टोबर महिन्यात मग न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत खऱ्या अर्थाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचे तिकीट भारताला मिळणार की नाही हे स्पष्ट होणार आहे.
यानंतर नोव्हेंबर ते डिसेंबर 2024 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्याची कसोटी मालिका होणार आहे. या कसोटी मालिकेसाठी भारत ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. यामुळे ही देखील मालिका विशेष रोमांचक होणार अशी आशा आहे. एकंदरीत आयपीएल, टी ट्वेंटी विश्वचषक झाल्यानंतरही भारतीय संघ अनेक टी ट्वेंटी, वन डे आणि कसोटी सामने खेळणार आहे.