घरची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती आणि कुठल्याही गोष्टींमध्ये मिळणारे यश याचा दुरान्वये देखील काही संबंध नसतो. कारण आहे ती परिस्थितीत खिळून बसण्यापेक्षा काहीतरी मिळवण्याची जिद्द ठेवून केलेले प्रयत्न, प्रचंड इच्छाशक्ती आणि कष्टाच्या जोरावर व्यक्ती आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक परिस्थितीत देखील बदल करू शकतो. अशा प्रकारचे अनेक उदाहरणे आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतात.
परिस्थितीला धरून रडत बसण्यापेक्षा त्या परिस्थितीशी दोन हात करून संघर्ष करण्यातच जीवनाचे ध्येय मानणारे तरुण-तरुणी या आयुष्यामध्ये यशस्वी होतात. याच मुद्द्याला धरून जर आपण जळगाव जिल्ह्यातील भुसावळ या ठिकाणाच्या दिपाली सूर्यवंशी यांची कहाणी पाहिली तर ती या मुद्द्याला खूप साजेशी अशी आहे. त्यांचीच यशोगाथा आपण या लेखामध्ये बघणार आहोत.
रिक्षा चालकाच्या मुलीची एकाच वेळी दोन शासकीय पदांवर निवड
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील निंबा सूर्यवंशी हे रिक्षा चालक असून गेल्या 30 ते 35 वर्षापासून ते या व्यवसायात आहेत. हाच व्यवसाय त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय आहे. जर निंबा सूर्यवंशी यांची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिली तर त्यांना पाच मुली असून दिपाली ही सर्वात लहान मुलगी आहे. लहानपणापासून त्यांनी वडिलांनी केलेले कष्ट जवळून बघितल्याने त्यांना कष्टाची जाणीव होती.
त्याच पद्धतीने त्यांच्या वडिलांचे देखील इच्छा होती की दिपाली यांनी शासकीय सेवेमध्ये जावे. त्यादृष्टीने दिपाली यांनी प्रयत्न देखील सुरू केले व मध्यंतरीच्या कालावधीत म्हणजेच 2008 मध्ये दिपाली यांचे लग्न झाले. शिरपूर तालुक्यातील अर्थ हे गाव त्यांचे सासर असून सासरी कुटुंब हे शेतकरी असल्यामुळे घरची शेती सांभाळत आणि मुलाची जबाबदारी घेत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्याचा निश्चय केला. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या या निर्णयाला त्यांच्या सासरकरच्या मंडळींनी पाठिंबा दिला. माहेरी वडिलांचे पाहिलेले कष्ट व इकडे सासरी शेतकरी कुटुंबातील जीवन जवळून अनुभवता आले असल्यामुळे त्यांनी सातत्याने अभ्यास करणे सुरू केले व प्रयत्न केले.
त्यामध्ये त्यांनी नित्यनेमाने वाचन, मैदानात देखील सराव कंटिन्यू सुरू ठेवला व स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी माहेरी देखील येऊन राहावे लागले. हे प्रयत्न त्यांचे बरेच वर्षे सुरू होते. अखेरीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये त्यांनी उत्तुंग यश मिळवले. या परीक्षेत त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली. तसेच महत्त्वाचे म्हणजे याच कालावधीमध्ये क्लर्क पदासाठी देखील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिलेली होती ती सुद्धा दिपाली यांनी उत्तीर्ण केली.
एकाच वेळी दोन शासकीय पदे दिपाली यांना मिळाली. परंतु देशाचे सेवा करावी या उद्दिष्टाने त्यांनी क्लर्क पदाची निवड न करता पोलीस उपनिरीक्षक पदाची निवड करण्याचे ठरवले आहे. या दिपाली यांच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते की परिस्थिती कशी राहिली तरी जर ध्येय निश्चित केले व ते पूर्ण करण्याकरिता सातत्याने कष्ट केले तर नक्कीच यश मिळू शकते.