स्पेशल

दिनमान काळा होणार , बाया न्हात्यान, धुत्यान व पालखीत मिरत्याल… अस्थिरता निर्माण होणार असल्याचे भाकित !

निमगाव वाघा (ता. नगर) येथील प्रसिध्द बिरोबा देवस्थान येथे गुरुवारी (दि.17 ऑक्टोबर) झालेल्या होईकात (भविष्यवाणी) दहा खंडात चळवळ होऊन दिनमान काळा होणार असल्याचे म्हणजेच सर्वच क्षेत्रात चळवळी होऊन अस्थिरता निर्माण होणार असल्याचे भाकित वर्तविण्यात आले. तर खंडात रक्ताचा पूर वाहणार म्हणजेच युध्दजन्य परिस्थिती राहणार व जेठुडी साधली जाईल म्हणजेच चांगला पाऊस होऊन मृगराळ्याची पेर होईल आणि काही ठिकाणी मोडघड होईल  असे सांगण्यात आले.

होईकच्या या धार्मिक कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागील वर्षीचे युध्दजन्य परिस्थितीचे भाकित व अत्यंत कठिण काळाचे भाकित खरे ठरले असून, यावर्षी देखील जगाच्या पाठिवर युध्दजन्य परिस्थितीचे भाकित वर्तविण्यात आलेले आहे. देवाचे भगत नामदेव भुसारे यांनी होईक सांगताना पुढील वर्षी येणाऱ्या संकटाचे स्पष्टीकरण दिल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला.
गावात पशु हत्या बंदीचे पालन करुन देवाला भाजी-भाकरीचा नैवद्य दाखविण्यात आले. सकाळी बिरोबाच्या ओव्या सादर करण्यात आल्या. देवाचे भगत नामदेव भुसारे यांच्या अंगात वारे संचारल्यानंतर त्यांनी स्वत:च्या अंगावर वेताचे फटके ओढून होईक (भविष्यवाणी) सांगितले.

होईकात ते म्हणाले की, बाया न्हात्यान, धुत्यान व पालखीत मिरत्याल. लक्ष्मीला म्हणजेच पशु धनाला पिडा असल्याचे त्यांनी सांगितले. बाळाला यावर्षी संकट नसून, चित्ता सवातीचा तीन ते पाच दिवस आभाळ फिरेल. म्हणजेच काही ठिकाणी पाऊस पडेल व काही ठिकाणी पडणार नाही.

दिवाळीच दिपान अडीच ते पाच दिवस सर्वत्र आभाळ येऊन पाऊस पडेल. सटीच सटवान पाच ते सात दिवस तीन खंडात आभाळ फिरेल. गायी देठाला लागून, नव तूप होणार. सध्याच्या पिकांना रोगराई असणार आहे.
सोन्याचे भाव उच्चांकी गाठेल. तर कापूस, गहू, हरभराचे मनभाव राहणार असल्याचे सांगितले. तर कल्याण कुर्तिकाचा सात खंडात नऊ ते अकरा दिवस आभाळ फिरुन पाऊस होणार. पेंढी पालखीत मिरल,  मुगराळ्याची चांगली होणार, आषाढी साधली जाणार म्हणजेच पाऊस होणार. तर ज्वारीची पेर होईल व गहू, हरभराची पेर होऊन मोडघोड होणार व त्याला अपकार होऊन  तांबारा पडणार असल्याचे भाकीत सांगण्यात आले आहे.

गावातील होईकाच्या आयोजनासाठी ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते पै.नाना डोंगरे, बाबासाहेब जाधव, गोकुळ जाधव, रामदास वाखारे, अंशाबापू शिंदे, बाबा पुंड, पांडुरंग गुंजाळ, बबन कापसे, बाळू भुसारे, परबती कदम, अंबादास निकम, नवनाथ जाधव, सुरेश जाधव, ठकाराम शिंदे, रावसाहेब भुसारे, जालिंदर जाधव, भाऊ होळकर, नामदेव जाधव, शिवाजी फुलमाळी, रामदास फुलमाळी, साहेबराव बोडखे, संजय कापसे, बाबा खळदकर, संजय डोंगरे, सुखदेव जाधव, राजू भुसारे, कोंडीराम नाट, गुलाब जाधव, निलेश भुसारे, राजू भुसारे, जयराम जाधव आदी उपस्थित होते. होईकासाठी आलेल्या पंचक्रोशीतील भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts