Dragon Fruit Farming:- अनेक उच्चशिक्षित तरुण-तरुणी आता शेतीकडे मोठ्या प्रमाणावर वळले असून शेतीमध्ये त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून खूप मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणलेले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि परंपरागत पिकांची लागवड न करता त्या ऐवजी विविध भाजीपाला आणि फळपिकांच्या लागवडीमुळे लाखोत उत्पन्न मिळवण्यामध्ये असे तरुण आता यशस्वी झाल्याचे आपल्याला दिसून येते.’
अगदी याच पद्धतीने जर आपण बिहार राज्यातील किशनगंज जिल्ह्यातील रहिवासी असलेले प्रगतिशील शेतकरी कृष्णा जैमीनी यांची यशोगाथा बघितली तर इतर तरुणांसाठी प्रेरणादायी असे आहे.
कृष्णा यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दुर्गापूर येथे आयटीमध्ये इंजीनियरिंगची पदवी मिळवली व आठ वर्षांपर्यंत एका एमएनसी कंपनीत चांगल्या पॅकेजची नोकरी देखील केली. परंतु नोकरीत मन न लागल्यामुळे शेती करण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकले व शेतीत ड्रॅगन फ्रुट लागवड करण्याचा निर्णय घेतला.
अशी सुचली ड्रॅगन फ्रुट फार्मिंगची कल्पना
जेव्हा कोरोना कालावधीमुळे लॉकडाऊन लागलेले होते व लॉकडाऊनचा कालावधी संपला त्यानंतर जैमीनी कृष्णा यांनी किशनगंज येथील कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली व त्या माध्यमातून ड्रॅगन फ्रुट शेती बद्दल पूर्ण माहिती मिळवली. ड्रॅगन फ्रुट लागवड करणारे इतर शेतकरी आणि कृषी तज्ञांशी याबाबत चर्चा करून ड्रॅगन फ्रुट लागवडीचा निर्णय घेतला.
ड्रॅगन फ्रुट बद्दल जर आपण बघितले तर हे एक उष्णकटिबंधीय फळ असून अगदी 44 ते 45 अंश सेल्सिअस तापमानामध्ये देखील तग धरू शकते. ड्रॅगन फ्रुट शेती बद्दल अधिकची माहिती देताना जैमिनी यांनी सांगितले की, या पिकाला जून ते जुलै महिन्यामध्ये फुले येतात आणि त्यानंतर फळधारणा सुरू होते.
हंगामामध्ये हे फळ दीडशे ते 180 रुपये प्रति किलो दराने विकले जाते व ऑफ सीजन म्हणजेच नोवेंबर ते डिसेंबरमध्ये 200 ते 250 रुपये प्रति किल पर्यंत याचे दर पोहोचतात. जेमिनी त्यांनी पिकवलेले ड्रॅगन फ्रुट हे प्रामुख्याने सिलीगुडी बाजारपेठेमध्ये विकतात त्याशिवाय जवळच्या जिल्ह्यांमध्ये देखील पुरवठा करतात.
जैमिनी कृष्णा किती मिळवतात नफा?
प्रगतिशील शेतकरी जैमीनी कृष्ण यांनी सुरुवातीला जवळपास अडीच एकरमध्ये पाच हजार ड्रॅगन फ्रुट रोपांची लागवड केली व रोपांसाठी आवश्यक असलेले खांब तसेच शेत तयार करण्यासाठी असे सगळे मिळून त्यांना 12 ते 14 लाखांचा खर्च आला.
परंतु एकदा हा खर्च केल्यानंतर मात्र त्यांना आता प्रत्येक वर्षाला 12 ते 14 लाख रुपयांचा नफा मिळत आहे. ड्रॅगन फ्रुट हे बारमाही उत्पादन देणारे पीक असून एकदा लागवड केल्यानंतर दहा ते बारा वर्षे सातत्यपूर्ण उत्पादन देते.
अशा पद्धतीने जे विद्यार्थी करिअर सोडून किंवा नोकरी सोडून कृषी क्षेत्रामध्ये काहीतरी नवीन करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी जैमिनी कृष्णा यांची यशोगाथा एक प्रेरणादायी आहे.
याबाबत ते म्हणतात की, जर शेतकऱ्यांनी आव्हानांचा धैर्याने सामना केला आणि नवीन तंत्रज्ञान आणि पिकांचा शेतीमध्ये अवलंब केला तर शेतकरी केवळ आर्थिक दृष्ट्या सक्षम बनू शकत नाही तर स्वतःची ओळख देखील निर्माण करू शकतात.