Edible Oil Price Hike : सर्वसामान्य गेल्या काही वर्षांपासून वाढत्या महागाईमुळे चिंतेत आहे. महागाईची झळ सर्वसामान्यांना भरडून काढत आहे. आधीच वाढत्या महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना आणखी एक मोठा फटका बसणार आहे. कारण की ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये खाद्यतेलाच्या किंमती वाढणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या एका नवीन निर्णयामुळे खाद्यतेलाच्या किमती वाढणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की केंद्रातील मोदी सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेत खाद्यतेलांवरील कस्टम ड्युटी वाढवली आहे. सूर्यफूल तेल, पामतेल आणि सोयाबीन तेलावरील कस्टम ड्युटी म्हणजे आयात शुल्कमध्ये वाढ करण्यात आली आहे.
याबाबतची सरकारी अधिसूचना देखील नुकतीचं निर्गमित करण्यात आली आहे. सरकारने जारी केलेल्या नवीन सुधारित अधिसूचनेनुसार, कच्च्या तेलावरील कस्टम ड्युटी शून्यावरून 20 टक्के करण्यात आली आहे, तर रिफाइंड तेलावरील कस्टम ड्युटी आता 32.5 टक्के करण्यात आली आहे.
कच्चे आणि शुद्ध सूर्यफूल तेल, पाम तेल आणि सोयाबीन तेलावरील मूळ सीमाशुल्क वाढवण्याची घोषणा सरकारने केली आहे. हे शुल्क 20 टक्के आणि 32.5 टक्के करण्यात आले आहे. कस्टम ड्युटीमध्ये बदल केल्यानंतर, नवीन दर आजपासून म्हणजेच 14 सप्टेंबर 2024 पासून लागू करण्यात आले आहेत.
क्रूडवर बेसिक कस्टम ड्युटी 0-20% आहे, तर रिफाइंड तेलावर ते आता 12.5-32.5% आहे. बेसिक कस्टम ड्युटी वाढल्यानंतर आता क्रूड ऑइल आणि रिफाइंड ऑइलवरील प्रभावी ड्युटी अनुक्रमे 5.5 टक्क्यांवरून 27.5 टक्के आणि 13.75 टक्क्यांवरून 35.75 टक्के होईल.
यामुळे देशात खाद्यतेलाची आयात महाग होईल अन त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये खाद्यतेलाच्या किमती वाढतील असे जाणकारांचे म्हणणे आहे. याशिवाय, सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
वास्तविक, मोदी सरकारने कांद्यावरील किमान निर्यात मूल्य हटवले आहे. याशिवाय कांद्यावरील निर्यात शुल्क 40 टक्क्यांवरून 20 टक्के करण्यात आले आहे. सरकारच्या या पावलाचा परिणाम गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या कांद्याच्या भावावरही दिसून येत आहे.
या संदर्भात डीजीएफटीने अधिसूचना जारी केली असून पुढील आदेशापर्यंत कांदा निर्यातीवरील एमईपी काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कांद्याव्यतिरिक्त बासमती तांदळाच्या निर्यातीवरील किमान निर्यात मूल्यही सरकारने काढून टाकले आहे. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि शेतमालाच्या किमती वाढतील अशी आशा आहे.
त्यामुळे सणासुदीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळणार आहे तर सर्वसामान्य नागरिकांचे स्वयंपाक घरातील बजेट आणखी बिघडण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये खाद्यतेलाच्या किमती काहींशा वाढल्या सुद्धा आहेत. आता आपण खाद्यतेलाच्या सध्याच्या किमती थोडक्यात जाणून घेणार आहोत.
खाद्यतेलाचे नवीन दर खालील प्रमाणे
शेंगदाणा तेल – १८२ ते १८८
सोयाबीन तेल – ११५ ते १२०
पामतेल – ११५ ते १२०
सूर्यफूल तेल – १२० ते १२५