Edible Oil Price : उद्या गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. गणेशोत्सवाच्या नंतर नवरात्र उत्सव, विजयादशमी अर्थातच दसरा आणि दिवाळीचे मोठे सण येणार आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच नवरात्र उत्सव आणि विजयादशमीची धूम असेल. तसेच ऑक्टोबरच्या शेवटी दिवाळीची धूम पाहायला मिळणार आहे. परंतु हे मोठे सण येण्याआधीच सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे खाद्य तेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांमध्ये सर्वसामान्यांचा खिसा रिकामा होणार आहे. केंद्रातील सरकारने विविध खाद्यतेलाच्या आयातीचे शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याने खाद्यतेलाची आयात मंदावणार आणि याचा परिणाम म्हणून खाद्यतेलाचे भाव आगामी काळात आणखी वाढणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
केंद्रातील सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळणार यात शंकाच नाही मात्र हा निर्णय सर्वसामान्य नागरिकांची डोकेदुखी वाढवणारा ठरत आहे. महत्त्वाचे म्हणजे या निर्णयानंतर तेलबिया पिकाचे भाव फारसे वाढलेले नाहीत पण खाद्य तेलाचे भाव लगेचच वाढलेत. यामुळे या निर्णयाने शेतकऱ्यांचा फायदा कमी अन सर्वसामान्य ग्राहकांचे नुकसान जास्त होत असल्याचे दिसत आहे.
15 किलोचा तेलाचा डब्बा आता कितीला?
सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर अवघ्या काही तासातच बाजारात खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत. सूर्यफूल, शेंगदाणा, सोयाबीन, पाम तेलच्या किमती आता विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. केंद्रातील सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर लगेचच तेलाच्या डब्याची किंमत अडीचशे रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये सर्वसामान्यांची आर्थिक कोंडी होणार आहे.
सरकारने किती वाढवले आयात शुल्क
केंद्रातील सरकारने, कच्चे पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावरील मूलभूत कस्टम ड्युटी 20 टक्के वाढवली आहे. आतापर्यंत हा दर शून्य होता. अर्थातच या कच्च्या तेलांच्या आयातीवर कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. पण, आता ते २० टक्के करण्यात आले आहे.
दुसरीकडे शुद्ध सूर्यफूल तेल, शुद्ध पाम तेल आणि शुद्ध सोयाबीन तेलावरील मूळ कस्टम ड्युटीचा दर 12.5 टक्क्यांवरून ३२.५ टक्के करण्यात आला आहे. यामुळे आता आयात होणारे कच्चे खाद्यतेल आणि रिफाइंड खाद्यतेल महागणार आहे.
कस्टम ड्युटी वाढली असल्याने आता खाद्यतेलाचे प्रभावी शुल्कही वाढणार आहे. क्रूड पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावरील प्रभावी शुल्क आतापर्यंत ५.५ टक्के होते. पण ते आता २७.५ टक्के करण्यात आले आहे.
तसेच, शुद्ध सूर्यफूल तेल, शुद्ध पाम तेल आणि शुद्ध सोयाबीन तेलाची प्रभावी किंमत आधी १३.७५ टक्के होती ती आता ३५.७५ टक्के झाली आहे. साहजिकच याचा थेट फटका ग्राहकांना बसणार आहे. यामुळे सर्वसामान्यांमध्ये सरकार विरोधात पुन्हा एकदा नाराजीची लाट पाहायला मिळत आहे.
जाणकार लोकांनी याचा फटका महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना बसू शकतो असे म्हटले आहे. यामुळे खाद्यतेल आयात शुल्क वाढवण्याचा हा निर्णय महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला कितपत धक्का देणार ही गोष्ट विशेष पाहण्यासारखी ठरणार आहे.