Edible Oil Rate : सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारांची त्सुनामी आली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू आहे. मतदानासाठी आता अवघ्या पाच दिवसांचा काळ बाकी असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून जीवाचं रान केलं जात आहे.
दरम्यान ऐन निवडणुकीच्या धामधुमीत सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागत आहे. अवघ्या एका महिन्याच्या काळात खाद्यतेलाच्या किमतीत मोठी वाढ नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे स्वयंपाक घरातील बजेट कोलमडले असून महिला वर्गात सरकार विरोधात नाराजी वाढली आहे.
खाद्यतेलाच्या किमती अवघ्या एका महिन्याच्या काळात आठ टक्क्यांपर्यंत वाढल्या असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना घर खर्चासाठी आता अधिकचा बजेट काढून ठेवावा लागतोय.
लाडक्या बहिणींना पैसे द्यायचे आणि दाजीच्या खिशातून पैसे गायब करायचेत असे सध्या सुरु आहे काय? असाही सवाल आता संतप्त नागरिकांच्या माध्यमातून उपस्थित केला जातोय. दरम्यान आता आपण केलेल्या एका महिन्याच्या काळात खाद्यतेलाचे भाव प्रति लिटर मागे किती रुपयांनी वाढले आहेत सध्याचे खाद्यतेलाचे दर किती आहेत याचाच आढावा घेणार आहोत.
खाद्यतेलाने सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढवली!
ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात खाद्यतेलाच्या ज्या किमती होत्या त्या किमतीमध्ये आता तब्बल आठ टक्क्यांपर्यंत ची वाढ झाली आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, १४ ऑक्टोबर रोजी शेंगदाणा तेलाची किंमत १९३.५८ रुपये प्रति लिटर होती पण काल गुरुवारी ती एक टक्क्याने वाढून १९५.५९ रुपये प्रति लिटर झाली आहे.
मोहरीचे तेल सुद्धा २.५ टक्क्यांनी महाग झालंय सध्या मोहरीचे तेल १६७ रुपये प्रतिलिटर दराने विक्री होत आहे. वनस्पती तेल पाच टक्क्यांनी महागून १४२ रुपये प्रतिलिटर झाले आहे.
देशात सर्वाधिक वापर होणाऱ्या सोया तेलाची किंमत सुद्धा गेल्या एका महिन्याभराच्या काळात पाच टक्क्यांनी महागली आहे, काल सोया तेलाची किंमत १४१ रुपये प्रतिलिटर एवढी नमूद करण्यात आली.
सूर्यफूल तेलही चांगलेच महाग झाले आहे, हे खाद्यतेल पाच टक्क्यांनी वाढले. एका महिन्याभरापूर्वी सूर्यफूल तेलाची किंमत ही १४० रुपये होती पण काल याची किंमत १४७ रुपये प्रतिलिटर एवढी नमूद करण्यात आली आहे.
दुसरीकडे पामतेलाचे भाव सर्वाधिक ८ टक्क्यांनी वाढलेत. गेल्या महिन्यात पामतेल 120 रुपये प्रति लिटर या दराने विकले जात होते मात्र काल पाम तेलाची किंमत 129 रुपये प्रति लिटर एवढी नमूद करण्यात आली आहे. अर्थातच पामतेलाच्या किमतीत लिटर मागे नऊ रुपयांची वाढ झाली आहे.
यामुळे मात्र सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागत असून मतदानाच्या आधीच सर्वसामान्य जनता सरकारच्या धोरणावर नाराज झाली आहे. यामुळे सध्या जे खाद्यतेल सर्वसामान्य गोरगरीब जनतेला रडवत आहे तेच खाद्यतेल मतदानानंतर सत्ताधाऱ्यांना रडवणार की काय? अशाही चर्चा सध्या राज्यात सुरू आहेत.