Farmer Success Story : शेतीचा व्यवसाय हा गेल्या काही वर्षांमध्ये मोठा आव्हानात्मक बनला आहे. नैसर्गिक संकटांमुळे शेतीमधून काही प्रसंगी पिकासाठी आलेला खर्च देखील वसूल करता येत नाही. जर समजा एखाद्या पिकातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळाले तर बाजारात त्याला अपेक्षित दर मिळत नाही.
अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होते. पण, या प्रतिकूल परिस्थितीतही काही शेतकरी बांधव आपल्या अभिनव प्रयोगाच्या माध्यमातून शेतीमधून चांगली कमाई काढत आहेत. दरम्यान असाच एक प्रयोग अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी मधून समोर आला आहे.
राहुरी मधील एका प्रयोगशील शेतकऱ्याने उसामध्ये आंतरपीक म्हणून मुगाची लागवड केली आहे. उसाच्या पिकात फुले सुवर्ण या जातीची लागवड करून राहुरीच्या प्रयोगशील शेतकऱ्याने इतरांसाठी मार्गदर्शक काम केले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील सडे गावातील प्रगतशील शेतकरी प्रमोद धोंडे यांनी हा प्रयोग केलाय. त्यांनी आपल्या एक हेक्टर क्षेत्रावर हा अभिनव प्रयोग केला असून सध्या त्यांच्या या प्रयोगाची पंचक्रोशीत विशेष चर्चा सुरु आहे.
उसामध्ये मुगाची आंतरपीक म्हणून लागवड केली तर पाण्याची बचत होते. मूंग हे मुख्य कडधान्य पीक असल्याने हवेतून मोठ्या प्रमाणावर नत्र शोषून घेते अन ते नत्र इतर पिकांना उपलब्ध करून देते.
यामुळे नत्रयुक्त खतांची देखील बचत होते. अर्थातच कमी खर्चात आणि कमी पाण्यात शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळवता येणे शक्य होते. मूग हे पीक 65 दिवसांच्या आहे. यातील 50 दिवस मूग पीक हवेतून नत्राचा पुरवठा ऊस पिकाला करते.
त्यामुळे उसाची चांगली वाढ झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे ऊस पिकात मुगाची लागवड केल्यामुळे किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव देखील कमी प्रमाणात जाणवतो.
शेतकरी प्रमोद धोंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी सप्टेंबर महिन्यात उसात आंतरपीक म्हणून मुगाची लागवड केली. सध्या त्यांचे मुख्य पीक आणि आंतरपीक मूगं जोमदार अवस्थेत असून त्यांना या दोन्ही पिकांमधून चांगले उत्पादन मिळणार आहे.
एकंदरीत जर काळाचा ओघात शेतीमध्ये बदल केला, आंतरपीक पद्धतीचा अवलंब केला तर शेतकऱ्यांना चांगली कमाई करता येणे शक्य आहे, हेच धोंडे यांच्या या प्रयोगातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.