स्पेशल

जिद्द असावी तर अशी ! वयोवृद्ध शेतकरी दांपत्याने शेतीमध्ये केला नाविन्यपूर्ण प्रयोग; खडकाळ माळरानावर फुलवली चीकुची बाग, वाचा ही आगळी-वेगळी यशोगाथा

Farmer Success Story : गेल्या काही वर्षांपासून शेतीमध्ये शेतकऱ्यांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. नैसर्गिक तसेच सुलतानी संकटांमुळे शेतकरी राजा हतबल झाला आहे. परिस्थिती आता हाताबाहेर जात असून महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषता मराठवाडा आणि विदर्भ या दोन विभागात शेतकरी आत्महत्येची दाहकता सर्वाधिक असून यामुळे महाराष्ट्राच्या गौरवमयी इतिहासावर कलंक लागला आहे.

मात्र असे असले तरी राज्यातील काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी आपल्या नावीन्यपूर्ण प्रयोगाच्या माध्यमातून शेती व्यवसायातून चांगली कमाई करत इतरांपुढे आदर्श ठेवला आहे. दरम्यान आज आपण शेतकरी आत्महत्येसाठी कुख्यात बनलेल्या मराठवाडा विभागातील एका शेतकरी वयोवृद्ध दांपत्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्यांनी आपल्या उतार वयात शेती व्यवसायात असा काही प्रयोग केला आहे की नवयुवक शेतकऱ्यांना देखील त्यांनी विचारात पाडले आहे.

मराठवाडा विभागातील नांदेड जिल्ह्यातील मौजे तुप्पा येथील 71 वर्षीय शंकरराव पाकलवाड यांनी आपल्या खडकाळ माळरानावर चिकूची बाग फुलवली आहे. या कामी शंकरराव यांना त्यांच्या धर्मपत्नीची मोलाची अशी साथ लागली आहे. विशेष म्हणजे खडकाळ माळरानावर फुलवलेली ही चिकूची बाग कमी पाण्यात त्यांनी जोपासली असून यातून त्यांना चांगले उत्पन्न देखील मिळत आहे. खरं पाहता शंकरराव उच्चशिक्षित असून त्यांच्याकडे तीन एकर वडिलोपार्जित शेत जमीन आहे.

मात्र त्यांनी तीस वर्ष सिडको नांदेड येथे एका खाजगी कंपनीत नोकरी देखील केली आहे. त्यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांच यशस्वीरीत्या शिक्षण पूर्ण करून त्यांना जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून रुजू केल आहे. तसेच मुलींचं लग्न झालं आहे. दरम्यान मुलांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आणि नोकरीला लागल्यानंतर त्यांनी नोकरी सोडली आणि आपल्या गावी स्थलांतर केलं. गावात परतल्यानंतर त्यांनी आपल्या वडिलोपार्जित तीन एकर शेत जमिनीत नवनवीन प्रयोग करण्यास सुरुवात केली. खरं पाहता मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न हा आजही ज्वलंत आहे.

अशा परिस्थितीत शेती करणे त्यांच्यासाठी आव्हानात्मक होतं. यामुळे त्यांनी सर्वप्रथम पाण्याचा प्रश्न मिटवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी पाच बोरवेल केलेत. मात्र एकालाच पाणी लागलं तेही खूपच कमी. अशा परिस्थितीत कमी पाण्यात तग धरणाऱ्या पिकाची शेती आपल्याला करावी लागेल हे त्यांना कळून चुकलं. अशा परिस्थितीत त्यांनी अडीच एकरावर चिकूची बाग लावली. पाणी कमी आणि जमीन खडकाळ माळरानावरची त्यामुळे हा प्रयोग यशस्वी होईल का याबाबत साशँका होतीच.

मात्र, अडीच एकरावर लावलेल्या या 100 झाडांचा प्रयोग या अवलिया शेतकऱ्याने आपल्या जिद्दीच्या जोरावर यशस्वी करून दाखवला. 1990 मध्ये लागवड केलेल्या या बागेतुन 1994 पासून प्रत्यक्षात उत्पन्न मिळू लागले. सध्या स्थितीला वर्षाकाठी आठ ते दहा हजाराचा खर्च या बागेसाठी येत असून कमी पाण्यात ही बाग त्यांनी जोपासली आहे. याबाबत शंकरराव सांगतात की, वर्षाकाठी आठ ते दहा हजार रुपये चिकू बागेसाठी खर्च करतो आणि यातून मिळणारे उत्पन्न संपूर्ण वर्षभर आमचा दोघा नवरा बायकोचा खर्च भागवून काढतो.

मुलं चांगल्या नोकरीवर असतानाही आम्हाला त्यांच्याकडून पैसे मागण्याची गरज भासत नाही असं अभिमानाने शंकरराव नमूद करतात. निश्चितच उतार वयात केलेला हा प्रयोग केवळ शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक आहे असं नाही तर स्वाभिमानी आयुष्य कसं जगलं पाहिजे याचंच हे एक जिवंत उदाहरण आहे. 

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts