Farmer Success Story : गेल्या काही वर्षांपासून शेतीचा व्यवसाय मोठा आव्हानांत्मक बनला आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे शेतकरी राजा भरडला जात आहे. अतिवृष्टी, दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट यांसारख्या असंख्य संकटांमुळे शेतकऱ्यांना शेती पिकांमधून अपेक्षित उत्पादन मिळत नाहीये.
शिवाय उत्पादित झालेल्या मालाला अनेकदा अपेक्षित दरही मिळत नाही. सोयाबीन, कापूस, कांदा समवेत सर्वच पिकांचे बाजार भाव दबावात आहेत. अशा या विपरीत परिस्थितीत मात्र विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने भाजीपाला पिकातून लाखों रुपयांची कमाई केली आहे.
गोड पिंपरी तालुक्यातील वेजगाव येथील बाबुराव अस्वले आणि दीपक अस्वले या बापलेकाच्या जोडीने कारल्याच्या पिकातून लाखोंची कमाई करून दाखवली आहे. शेती नफ्याची राहिलेली नाही अशी ओरड तुम्ही अनेकदा ऐकली असेल.
पण, अस्वले यांच्यासारखे प्रयोगशील शेतकरी ही गोष्ट चुकीची ठरवत आहेत. शेतीमधूनही लाखोंची कमाई करता येऊ शकते हेच या बाप लेकाच्या जोडीने दाखवून दिले आहे. बाबुराव हे 65 वर्षांचे शेतकरी. उतार वयात देखील त्यांना शेतीचा मोठा लळा आहे.
अवतार वयात त्यांनी आपल्या मुलासोबत अर्थातच दीपक यांच्या समवेत शेतीला फायद्याचा सौदा करून दाखवला आहे. ते आपल्या दोन एकर जमिनीत वेगवेगळ्या भाजीपाला पिकांची लागवड करत असतात.
ते मिरची व इतर भाजीपाला पिकांची आपल्या शेतात लागवड करतात. यावेळी त्यांनी आपल्या दीड एकर जमिनीत कारल्याची लागवड केली. गावातीलच एका प्रयोगशील शेतकऱ्याने आधी कारल्याची लागवड केलेली होती.
त्यांनी त्याच प्रयोगशील शेतकऱ्याकडून कारल्याच्या लागवडीची माहिती घेतली आणि कारल्याची लागवड केली. दीड एकर जमिनीत कारले लागवड करण्यासाठी अस्वले यांना जवळपास 50 हजार रुपयांचा खर्च आला.
विशेष म्हणजे त्यांनी लागवड केलेल्या कारले पिकातून त्यांना चांगले विक्रमी उत्पादन सुद्धा मिळाले आहे. अस्वले यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी चंद्रपूरच्या बाजारात आतापर्यंत एक लाख रुपयांचे कारले विकले आहे. महत्वाचे म्हणजे त्यांना यातून एक ते दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.
आस्वले यांच्यासाठी कडू कारल्याने खऱ्या अर्थाने गोड कहाणी लिहली आहे. आस्वले पिता-पुत्राने शेतीमध्ये केलेली ही कामगिरी नक्कीच इतर प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी देखील मार्गदर्शक ठरणार आहे.