Farmer Success Story:- आता शेतकरी कमीत कमी क्षेत्रामध्ये आणि महत्त्वाचे म्हणजे खर्च कमी करून जास्तीत जास्त उत्पादन घेऊन लाखोत आर्थिक उत्पन्न मिळवताना आपल्याला दिसून येत आहे. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर जर बघितले तर पिकांचा उत्पादन खर्च हा रासायनिक खतांवर जास्त होत असतो.
त्यामुळे आता बरेच शेतकरी सेंद्रिय आणि जैविक पद्धतीचा वापर करून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसे मिळेल या दृष्टीने प्रयत्न करताना आपल्याला दिसून येत आहेत. तसेच पारंपारिक शेती व पिकपद्धतीने आता शेतकऱ्यांनी फाटा दिला असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने वेगवेगळ्या प्रकारच्या फळबागांची लागवड करून फळबाग शेतीतून आता बरेच शेतकरी आर्थिक समृद्ध होत आहेत.
अगदी याच पद्धतीने जर आपण धाराशिव जिल्ह्यात असलेल्या पाथरूड या गावचे प्रयोगशील शेतकरी संजय कुमार बोराडे यांची यशोगाथा पाहिली तर ती इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. या शेतकऱ्यांनी जैविक पद्धतीने सिताफळ बागेचे नियोजन करून कमीत कमी खर्चामध्ये चांगले आर्थिक उत्पन्न मिळवले असून सीताफळाच्या माध्यमातून आर्थिक समृद्धी साधली आहे.
संजय बोराडे यांनी साधली सिताफळ बागेतून आर्थिक उन्नती
याबाबत सविस्तर वृत्त असे की, धाराशिव जिल्ह्यात असलेल्या पाथरूड या गावचे प्रयोगशील शेतकरी संजय कुमार बोराडे या अगोदर पारंपारिक पद्धतीने शेती करायचे व यामध्ये सोयाबीन तसेच ज्वारी सारखे पारंपरिक पिकांचे उत्पादन घ्यायचे.
परंतु या पद्धतीने शेती करत असताना केला जाणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न यांचा ताळमेळ बसत नसल्यामुळे शेतीत काहीतरी बदल करावा व तंत्रज्ञानाचा वापर करून फळबाग लागवड करावी असे त्यांच्या मनामध्ये विचार सुरू होते व या विचारातूनच त्यांनी 2020 ला फळबाग लागवड करायचे ठरवले व त्याकरिता भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेच्या माध्यमातून लाभ घेतला
व सहा एकरावर फळबाग लागवड केली यामध्ये सिताफळ लागवड करून लागवडीनंतर दोन वर्ष सोयाबीनचे आंतरपीक देखील घेतली. या सगळ्या सिताफळ बागेचे जैविक पद्धतीने नियोजन केले व आज या सीताफळ बागेतून चांगले आर्थिक उत्पन्न त्यांना मिळत आहे.
पंधरा लाख रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा
संजय कुमार बोराडे यांनी सिताफळ बागेचे उत्तम नियोजन केले व आज एका झाडावर वीस ते पन्नास पर्यंत सिताफळ लगडले असून या फळबागेचे नियोजन करताना त्यांनी जवळपास 60 टक्के जैविक पद्धतीचा वापर केला व 40 टक्के रासायनिक पद्धत वापरली. या नियोजनामुळे त्यांचा सीताफळ बागेचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत झाली.
यावर्षी त्यांना साडेतीन लाख रुपयांचा खर्च आला व 30 टन सीताफळाचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा त्यांना असून यातून किमान 14 ते 15 लाख रुपयांचे उत्पन्न होईल अशी अपेक्षा त्यांना आहे. जैविक शेतीच्या माध्यमातून कमीत कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळवता येते हे त्यांनी त्यांच्या प्रयोगाच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांना दाखवून दिले आहे.
आतापर्यंत सीताफळ लागवडीपासून बघितले तर त्यांना दोनदा उत्पादन मिळाले आहे व पहिल्यांदा त्यांना या बागेतून चार लाख आणि दुसऱ्यांदा आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. अशाप्रकारे दोनदा त्यांना जवळपास 12 लाख रुपयांचे उत्पन्न हाती मिळाले आहे. तर यावर्षी पंधरा लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न मिळण्याची अपेक्षा त्यांना आहे.