स्पेशल

याला म्हणावं नादखुळा ! नामांकित कंपनीच्या नोकरीवर ठेवल तुळशीपत्र, सुरू केली स्ट्रॉबेरीची शेती ; करताय लाखोंची कमाई

Farmer Success Story : अलीकडे नवयुवक शेतकरी पुत्र शेती नको रे बाबा असा ओरड करत आहेत. अशातच मात्र काही प्रयोगशील सुशिक्षित नोकरीवर तुळशीपत्र ठेवत शेतीमध्ये करिअर घडवू पाहत आहेत. तर काहींनी शेतीमध्ये करिअर घडवलं देखील आहे. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्यांनी आपल्या चांगल्या पगाराच्या नोकरीवर तुळशीपत्र ठेवत शेतीमध्ये उतरून लाखो रुपयांची कमाई केली आहे.

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्याच्या मौजे कात्री येथील महेश पाटील यांनी नामांकित कंपनीतील आपली नोकरी सोडत शेतीसोबत नाळ घट्ट केली आहे. विशेष म्हणजे फक्त नावाला शेती करत आहेत असं नाही तर महेश वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक असं काम करत आहेत. यंदा त्यांनी आपल्या पाऊण एकर क्षेत्रात स्ट्रॉबेरी पिकाची लागवड करून वर्धा सारख्या उष्ण हवामानात देखील स्ट्रॉबेरी घेता येऊ शकते हे दाखवून दिले आहे.

खरं पाहता स्ट्रॉबेरी हे पीक थंड हवामानातील पीक म्हणून ओळखलं जातं. पिकाची अधिकतर लागवड हे महाबळेश्वर पाचगणी यांसारख्या थंड हवामानाच्या प्रदेशात पाहायला मिळते. अलीकडे नासिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात तसेच सटाणा तालुक्यातील काही भागात धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर भागात या पिकाचे क्षेत्र पाहायला मिळत आहे.

विशेषता मिनी कोकण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील आदिवासी बहुल आणि कोकणी पाड्यात या पिकाची लागवड अलीकडे वाढली आहे. मात्र वर्धा सारख्या उष्ण हवामानात महेश पाटील यांनी स्ट्रॉबेरीची केलेली यशस्वी लागवड आणि मिळवलेले भरघोस उत्पादन सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. खरं पाहता, महेश यांनी उत्पादित केलेले स्ट्रॉबेरी हे सेंद्रिय पद्धतीने उत्पादित झाले असल्याने बाजारात त्यांच्या स्ट्रॉबेरीला चांगली मागणी असून अधिक दर मिळत आहे.

यामुळे त्यांना स्ट्रॉबेरी पिकातून अवघ्या पाऊण एकर क्षेत्रातून चांगली कमाई झाली आहे. दरम्यान महेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्ट्रॉबेरी लागवड करण्यापूर्वी त्यांनी आपल्या पाऊण एकर शेतीजमिनीची चांगली मशागत करून घेतली. मशागत केल्यानंतर जमिनीत कंपोस्ट टाकण्यात आले. कंपोस्ट टाकल्यानंतर त्यांनी रोटावेटर फिरवत जमिनीत समतल आणि भुसभुशीत केली. यानंतर मग त्यांनी स्ट्रॉबेरी लागवडीसाठी बेड तयार केलेत.

तीन तीन फुटांवर बेड तयार करण्यात आलेत. यानंतर मग महेश यांनी पिकाच्या जोमदार वाढीसाठी सेंद्रिय बेसल डोस दिले. सेंद्रिय पद्धतीने स्ट्रॉबेरी उत्पादित करण्याचा त्यांचा मानस असल्याने त्यांनी बेसलं डोस मध्ये निंबोळी पेंट,कंपोस्ट खत आणि 5 किलो गुळाच्या पाण्याचे द्रावण बेडवर शिंपडले. यामुळे त्यांचे स्ट्रॉबेरी पीक चांगले बहरले. रोपांची लागवड केल्यानंतर अवघ्या 35 दिवसांनी पिक फुलोरा अवस्थेत आल्याचे त्यांनी नमूद केले.

यानंतर मग साधारणता दोन महिन्यानंतर फळ येण्यास सुरुवात झाली. अडीच महिन्याच्या आतच सेंद्रिय पद्धतीने स्ट्रॉबेरीच्या रोपावरच स्ट्रॉबेरीचे फळ पिकले. सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेले असल्याने आणि कच्चे न तोडता झाडावरच पिकू दिले असल्याने या स्ट्रॉबेरीचा रंग हा गडद लाल असून, एका स्ट्रॉबेरीच्या फळाचे वजन 30 ते 40 ग्रॅम असून स्ट्रॉबेरी खाण्यासाठी अधिक चविष्ट रुचकर आणि गोड आहे.

वर्धाच्या बाजारपेठेत पाटील यांनी स्ट्रॉबेरीची विक्री केली आहे. नागपूर यवतमाळ भंडारा चंद्रपूर कोणती आहे यांसारख्या जिल्ह्यातही त्यांनी उत्पादित केलेली स्ट्रॉबेरी विक्रीसाठी जात आहे. विशेष म्हणजे आजूबाजूच्या पंचक्रोशीत पाटील यांनी केलेला हा प्रयोग चर्चेचा विषय ठरत असून त्यांच्या बांधावर इतर प्रयोगशील शेतकऱ्यांची देखील हजेरी कायमच राहते. निश्चितच नामांकित कंपनीतील नोकरी सोडून शेतीमध्ये केलेला हा अभिनव उपक्रम त्यांच्यासाठी फायद्याचा तर ठरलाच आहे शिवाय इतर शेतकऱ्यांसाठी देखील एक रोडमॅप म्हणून काम करत आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts