Marathi News : जगभरात एलियन्स आहेत की नाही? हा प्रश्न अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. जगाच्या अनेक भागांमधून यूएफओ दिसल्याचे सांगितले जाते. परंतु आधुनिक विज्ञानाला याचा पुरावा अद्याप सापडलेला नाही.
मात्र यासंदर्भात अमेरिकेच्या सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी (सीआयए) च्या ऑफिस ऑफ ग्लोबल अॅक्सेस (ओजीए) या गोपनीय पथकाने जगभरातून कॅश झालेल्या यूएफओचे तुकडे गोळा केले असून अशाप्रकारे कॅश झालेल्या यूएफओची संख्या आश्चर्यचकित करणारी असल्याचे सांगण्यात येत आहे.
सीआयएच्या ओजीए युनिटला जगभरातून क्रैश झालेल्या यूएफओचे ९ पुरावे सापडले आहेत. यापैकी काही अपघातग्रस्त यूएफओचे तुकडे असून काही यूएफओ सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.
विशेष म्हणजे हे अंतराळ यान तथा यूएफओ मानवाने बनवलेले नसल्याचेही ओजीए युनिटच्या तपासात समोर आले असून ओजीएने २००३ पासून आतापर्यंत मानवेतर अंतराळ यानांविषयी थक्क करणारे संशोधन केले आहे.
या मिशनमध्ये सहभागी असलेल्या एकाने दिलेल्या माहितीनुसार, सीआयएचे ओजीए हे यूएस मिलिटरीद्वारे चालवलेले टॉप सिक्रेट मिशन असून त्यांच्याकडे लपलेले यूएफओ ओळखू शकणारी प्रणाली आहे,
तसेच यूएफओ पृथ्वीवर उतरतात तेव्हा त्यांची ओळख पटवण्यासाठी आणि राडारोडा नष्ट होण्यापासून रोखण्यासाठी विशेष लष्करी तुकड्याही पाठवल्या जातात. त्यांनी अशा अंतराळ यानाचे तुकडे अतिशय गोपनीयरीत्या संकलित करून जतन केले आहेत, जे कोणत्याही मानवाने तयार केलेले नाही.
अशाप्रकारे यूएफओविषयी चर्चा रंगण्याची ही पहिलीच वेळ नाही. मात्र यावेळी एलियन्सच्या अस्तित्वाबद्दल नासाचा एक अहवाल समोर आला असून त्यात यूएफओ किंवा एलियन्सच्या अस्तित्वाची शक्यता नाकारलेली नाही, उलट एलियन आणि यूएफओसारख्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली होती.
या समितीला यूएफओसाठी एलियन जबाबदार असल्याचा कोणताही पुरावा सापडला नाही, मात्र नासाने तशी शक्यता असल्याचेही नाकारलेले नाही, त्यामुळे आकाशात दिसणारे यूएफओ एलियन्सशी संबंधित असू शकतात, असे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.