स्पेशल

Ajab Gajab News : सापडली सोन्यापेक्षा मौल्यवान गोष्ट ! तिसऱ्या शतकातील…

Ajab Gajab News : इंग्लंडमधील पुरातत्त्व शास्त्रज्ञांना उत्खननादरम्यान रोमन काळातील एक रहस्यमय पदार्थ सापडला असून, हा पदार्थ इतिहासात तत्कालीन परिस्थितीत सोन्यापेक्षा मौल्यवान असेल, असा दावा इतिहास संशोधकांनी केला आहे.

विशेष म्हणजे संशोधकांनी या पदार्थाला टायरियन पर्पल अशी ओळख दिली असून, हा मऊ जांभळा पदार्थ संशोधकांना सापडला तेव्हा ते इंग्लंडच्या कार्लिस्ले कॅथेड्रल शहरात रोमन अवशेषांची तपासणी करत होते.

याविषयी पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, २०२३ मध्ये रोमन स्नानगृहाच्या उत्खननादरम्यान हा पदार्थ सापडला होता. ही तिसऱ्या शतकातील इमारत होती. पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी उत्खननादरम्यान सापडलेल्या सामग्रीची चाचणी घेण्यासाठी ब्रिटिश जिओलॉजिकल सोसायटीसोबत काम केले. न्यूकॅसल युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञांनी या पदार्थाची अधिक तपासणी केली.

या वेळी या पदार्थामध्ये ब्रोमाइन आणि मेणाचे प्रमाण सापडल्याने तो सेंद्रिय पदार्थ असल्याचे आढळले. तसेच तपासणीच्या परिणामांच्या आधारे हा पदार्थ म्हणजे टायरियन पर्पल असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

टायरियन पर्पल हा रोमन साम्राज्याच्या शाही दरबाराशी संबंधित एक विशेष रंग होता. त्यामुळे या रंगासोबत रोमन साम्राजाच्या इतिहासातील मोठा पैलू जगासमोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

इतिहास संशोधकांनी टायरियन पर्पल असल्याचे सांगितलेला हा पदार्थ उत्तर आफ्रिका आणि मोरोक्कोमधील हजारो ठेचलेल्या शिंपले (सीशेल्स) पासून बनवला जातो. रोमन कालखंडात हा पदार्थ बनवणे फारच अवघड होते, तसेच त्याचे उत्पादन करणे अतिशय खर्चिक होते. त्यामुळे त्याची किंमत सोन्यापेक्षाही जास्त होती. या शोधाने इतिहासाच्या एका मोठ्या शक्यतेचा दरवाजा उघडला आहे.

कदाचित तत्कालिन रोमन सम्राट सेप्टिमियस सेव्हरस याने कार्लिसलला टायरियन पर्पलची भेट दिली होती. उत्खनन करणाऱ्या संशोधक संस्थेचे प्रमुख तांत्रिक संचालक फ्रैंक गेको यांनी याला युरोपमधील एक मोठा शोध म्हटले असून, उत्तर युरोपमधील आमच्या माहितीमधील अशाप्रकारचा पदार्थ आढळण्याचे हे एकमेव उदाहरण आहे, असेही गेको यांनी सांगितले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts