Maharashtra News : शासनाकडून सर्वचस्तरावरील समाजासाठी विविध योजना राबवल्या जातात. विविध लाभ लाभार्थ्यांना दिले जातात. शासनाने अद्याप पर्यंत महिला, शेतकरी, सर्वसामान्य जनता आदींसाठी विविध योजना राबवल्या आहेत.
यामध्ये दिव्यांगांनाही शासन विविध योजना पुरवते. दिव्यांगांसाठी रोजगार निर्मितीस चालना देण्यासाठी तसेच त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे आदींसाठी विविध योजना शासन राबवते.
याअंतर्गत हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान दिव्यांगांना उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र दिव्यांग व वित्त विकास महामंडळामार्फत शंभर टक्के अनुदान दिले जाते. या योजनेसाठी सविस्तर जाणून घेऊयात –
मोफत ई-रिक्षा कुणाला मिळू शकते? कोण अर्ज करू शकतो?
मोफत ई-रिक्षा मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो. हा अर्ज करण्यासाठी लाभार्थ्यांचा क्रायटेरिया आहे. यासाठी लाभार्थी हा ४० टक्के दिव्यांग असला पाहिजे. तो १८ ते ५५ वयोगटातील असावा. तसेच लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपर्यंत असल्यास प्रथम प्राधान्य दिले जाते.
ई रिक्षाद्वारे तुम्ही कोणकोणते व्यवसाय करू शकता?
विविध खाद्यपदार्थ, किराणा, स्टेशनरी, पूजा साहित्य, बूट बॅग्ज दुरुस्ती, किरकोळ वस्तू भांडार, रद्दी भंगार वस्तू, फळांचे दुकान, भाजीपाला, प्रसाधने, मोबाइल दुरुस्ती, झेराक्स सेंटर, विविध स्वतंत्र व्यवसाय, वाहतूक व्यवसाय व इतर व्यवसाय लाभार्थ्याला याद्वारे करणे शक्य होते.
अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात?
अर्ज करताना काही कागदपत्रांची आवश्यकता आहे. यात दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, बँक पासबुक, रेशन कार्ड, यूडीआयडी कार्ड, जातीचा दाखला आदी कागदपत्रे लागतात.
अर्ज करण्याची मुदत कधीपर्यंत होती?
यंदाची या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत संपली आहे. महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळामार्फत १०० टक्के अनुदानावर दिव्यांगांना ई- रिक्षा दिली जात आहे. त्यासाठी ३ डिसेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली होती व सोमवार (दि. ८ जानेवारी) ही अंतिम मुदत होती.
या योजनेसाठी राज्यभरातून तब्बल ४५ हजार अर्ज प्राप्त झाले असून प्राप्त अर्जातून छाननी होऊन जिल्हानिहाय अर्ज वेगळे केले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.