Gautam Adani Became Richest Person In India : नुकत्याच काही दिवसांपूर्वी जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींची यादी समोर आली होती. यामध्ये मुकेश अंबानी हे देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अदानी उद्योग समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांच्यापेक्षा पुढे होते.
अदानी हे अंबानीच्या मागे होते. त्यावेळी अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते. आता मात्र यामध्ये मोठा उलटफेअर झाला आहे. जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत अदानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना धोबीपछाड दिली आहे.
अदानी उद्योग समूहाचे चेअरमन गौतम अदानी आता भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांनी आगेकूच केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अदानी उद्योग समूहाचे चेअरमन गौतम अदानी हे आता जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 12 व्या स्थानावर विराजमान झाले आहेत.
याआधी ते या यादीत तेराव्या स्थानावर होते. तसेच रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे या यादीत आतापर्यंत बाराव्या स्थानावर होते. मात्र आता मुकेश अंबानी यांना मागे टाकत गौतम अदानी 12 व्या स्थानावर गेले आहेत. याबरोबरच ते भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती देखील बनले आहेत.
जाणकारांनी सांगितल्याप्रमाणे, अदानी उद्योग समूहाच्या शेअर्समध्ये विक्रमी तेजी आली असल्याने गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. यामुळेच अदानी हे श्रीमंतांच्या यादीत बाराव्या स्थानावर आले आहेत. तसेच अंबानी हे श्रीमंतांच्या यादीत सध्या तेराव्या स्थानावर पोहचले आहेत.
रिपोर्टनुसार, गौतम अदानी यांची संपत्ती गेल्या एका वर्षात १.०८ लाख कोटी रुपयांनी वाढली आहे. सध्या त्यांच्याकडे ८.१२ लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. तसेच गेल्या एका वर्षाच्या काळात मुकेश अंबानी यांची संपत्ती ५ हजार कोटी रुपयांनी वाढली आहे. त्यांच्याकडे सध्या ८.०७ लाख कोटी रुपये एवढी संपत्ती आहे.
जगातील टॉप 5 श्रीमंत व्यक्ती कोण
जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या इलॉन मस्क हे पहिल्या स्थानावर असून त्यांच्याकडे १८.३१ लाख कोटी रुपये एवढी संपत्ती आहे. अमेझॉन चे संस्थापक जेफ बेझोस यांच्याकडे १४.०६ लाख कोटी रुपये एवढी संपत्ती असून ते दुसऱ्या स्थानावर आहेत.
तसेच या यादीत तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या बर्नार्ड अरनॉल्ट यांच्याकडे १३.९८ लाख कोटी एवढी संपत्ती आहे. बिल गेट्स हे चौथ्या स्थानावर असून त्यांच्याकडे ११.४८ लाख कोटी रुपये एवढी संपत्ती आहे. तसेच स्टिव्ह बाल्मर हे या यादीत पाचव्या स्थानावर असून त्यांच्याकडे १०.६५ लाख कोटी रुपये एवढी संपत्ती आहे.