Gold Purity:- सोने हा एक मौल्यवान धातू असून सध्या सोन्याच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे सोने खरेदी हे बऱ्याच लोकांच्या आर्थिक आवाक्या बाहेर गेल्याचे सध्या दिसून येत आहे. परंतु तरीदेखील लग्नकार्य किंवा इतर समारंभांमध्ये, सणासुदीच्या कालावधीत सोने खरेदीला मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते.
मात्र सोने खरेदी करताना सोन्याची शुद्धता आणि इतर गोष्टींकडे लक्ष देणे खूप गरजेचे असते. यामध्ये सोन्याची शुद्धता जर तुम्हाला ओळखायची असेल तर याकरिता खूप मोठे काही रॉकेट सायन्स नाही.
आपल्याला माहित आहे की सोने हे कॅरेटमध्ये मोजले जाते व सर्वात शुद्ध सोने 24 कॅरेट हे मानले जाते. परंतु यामध्ये मजेशीर गोष्ट अशी आहे की सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 24 कॅरेट सोन्याचा वापर न करता 18 आणि 22 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो.
सोन्याच्या कॅरेटनुसार त्याच्या किमती देखील वेगवेगळ्या असतात. त्यामुळे कोणत्या कॅरेटच्या सोन्यामध्ये सोन्याचे प्रमाण किती असते किंवा कोणत्या कॅरेटचे सोने किती शुद्ध असते? हे तुम्हाला माहित असणे तितकेच गरजेचे आहे.
अशा पद्धतीने ओळखा सोन्याची शुद्धता
हॉलमार्क चिन्हाच्या माध्यमातून सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता ओळखता येणे सोपे आहे. कोणत्याही सोन्याच्या दागिन्याची शुद्धता ओळखायची असेल तर कॅरेटचा वापर केला जातो. दागिने बनवण्यासाठी प्रामुख्याने 22 कॅरेट सोने वापरले जाते
व त्यावर 916 असा अंक लिहिलेला असतो. 24 कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध सोने मानले जाते व त्यावर 999 असा अंक लिहिलेला असतो. 21 कॅरेटच्या सोन्यावर 875 तर 18 कॅरेटच्या दागिन्यांवर 750 असे लिहिलेले असते. जर 14 कॅरेट चे दागिने असतील तर त्यावर 585 असे लिहिलेले असते.
24 आणि 18 कॅरेटमध्ये प्रामुख्याने काय फरक असतो?
22 कॅरेट सोन्यामध्ये 91.67% शुद्ध सोने असते. तर उर्वरित 8.33% इतर धातू असतात. त्या तुलनेमध्ये 21 कॅरेट सोन्यात 87.5% शुद्ध सोने असते. तर 18 कॅरेट मध्ये 75 टक्के शुद्ध सोने असते आणि 14 कॅरेट सोन्यामध्ये 58.5% शुद्ध सोने असते.
24 कॅरेट सोने प्रामुख्याने दागिने बनवण्यासाठी वापरले जात नाही. परंतु त्याचे सोन्याचे बार किंवा सोन्याची नाणी बनवण्यासाठी वापर केला जातो. सोन्याचे दागिने बनवण्यासाठी फक्त 18 किंवा 22 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. अशा पद्धतीने तुम्ही कॅरेट वरून सोन्याची शुद्धता ओळखू शकता.
हा आहे सोन्याची शुद्धता ओळखण्याचा सोपा मार्ग
सोने खरे आहे की खोटे हे जाणून घेण्यासाठी व सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी तुम्ही चुंबकीय पद्धतीचा वापर करू शकता. आपल्याला माहित आहे की सोने हा चुंबकीय गुणधर्म नसलेला धातू आहे.
त्यामुळे जर तुम्ही सोन्याजवळ चुंबक ठेवले किंवा चुंबकाजवळ सोने ठेवले तर तुमचे सोने चुंबकाला चिकटत नाही. सोन्याचे कॅरेट जितके कमी असेल तितके ते जास्त प्रमाणात चुंबकाला चिकटते. चुंबकाला चिकटणारे सोने हे बनावट किंवा कमी कॅरेटचे मानले जाते. साधारणपणे दहा कॅरेटपेक्षा कमी वजनाचे सोने हे अशुद्ध मानले जाते.