Government Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे जुनी पेन्शन योजना संदर्भात. आम्ही आपणास सांगू इच्छितो की 2005 नंतर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत जे कर्मचारी रुजू झाले आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याऐवजी नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे.
ही नवीन योजना केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर बहाल करण्यात आली असून या योजनेचा अगदी सुरुवातीपासूनच विरोध केला जात आहे. नवीन पेन्शन योजना म्हणजेच राष्ट्रीय पेन्शन योजना शेअर बाजारावर आधारित असून यामध्ये कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शनची हमी मिळत नाही यामुळे या योजनेचा कडाडून विरोध केला जातोय.
दरम्यान याच विरोधाच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने सुधारित पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा केली आहे. राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना ( New NPS) व केंद्र सरकारने लागू केली एकीकृत पेन्शन योजना ( UPS ) यापैकी एक पेन्शन प्रणाली निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
मात्र महाराष्ट्र राज्यातील बहुसंख्य कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना मान्य नाही. राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जुनी पेन्शन योजना जशी आहे तशीच लागू करा अशी मागणी सातत्याने उपस्थित केली जात आहे. पूर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे हा आमचा अधिकार आहे असे सरकारी कर्मचारी ठणकावून सांगत आहेत.
दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्य कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या अशा जुनी पेन्शन योजनेबाबत महाविकास आघाडीने मोठी घोषणा केली आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले तर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे जशी आहे तशी लागू करू अशी ग्वाही आणि आश्वासन महाविकास आघाडीने आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे.
महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या 17 लाख कर्मचाऱ्यांसाठी त्यांना हवी असणारी जुनी पेन्शन योजना जशाच्या तशी लागू करण्याचे आश्वासन महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट असणाऱ्या घटक पक्षांकडून दिले जात आहे.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी शिर्डी येथे संपन्न झालेल्या राज्य कर्मचाऱ्यांच्या महा-पेन्शन अधिवेशनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाचे अध्यक्ष श्री. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणांच्या अनुषंगाने विधानसभा निवडणूकीच्या जाहीरनाम्यात कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनची बाब नमूद करण्यात आली आहे.
यामुळे राज्य कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आलेली ही घोषणा महा विकास आघाडीला फायदेशीर ठरणार का, जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या आश्वासनामुळे पुन्हा एकदा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापित होणार का ही गोष्ट पाहण्यासारखी ठरणार आहे.