Grape Farming : राज्यात द्राक्ष पिकाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात द्राक्ष लागवड अधिक होते. नाशिक जिल्हा तर द्राक्ष उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण द्राक्ष या पिकावर अवलंबून आहे. एकंदरीत द्राक्षाची शेती राज्यासह संपूर्ण भारत वर्षात मोठ्या प्रमाणात होत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी शास्त्रज्ञांच्या माध्यमातून कायमच वेगवेगळे संशोधन कार्य केले जाते.
नवनवीन वाणाची निर्मिती शास्त्रज्ञांच्या माध्यमातून होते. द्राक्षाचे अधिकचे उत्पादन शेतकऱ्यांना घेता यावे यासाठी नवीन जातीची निर्मिती शास्त्रज्ञ करत असतात. दरम्यान आता सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्याच्या एका शेतकऱ्याने देखील द्राक्षाचे नवीन वाण शोधले आहे. त्यामुळे सध्या या शेतकऱ्याची मोठी चर्चा रंगत आहे.
हे पण वाचा :- नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना; शेतकऱ्यांनो, योजनेसाठी अर्ज करताना ‘ही’ कागदपत्रे लागणार, वाचा सविस्तर
तालुक्याच्या मौजे सावंतपूर येथील जयकर माने नामक द्राक्ष बागायतदाराने या द्राक्षाच्या नवीन वाणाचा शोध लावला आहे. या नव्याने विकसित केलेल्या जातीला त्यांनी ब्लॅक क्वीन बेरी असं नाव दिलं असून यासाठी त्यांनी तब्बल दहा वर्ष प्रयोग केले आहेत. विशेष म्हणजे या वाणाला दिल्ली नॅशनल रिसर्च सेंटर चे पेटंट देखील मिळाले आहे. जयकर यांनी दिलेल्या माहितीनुसार ते गेल्या वीस वर्षांपासून द्राक्षाची शेती करत आहेत.
काही काळ त्यांनी कृषी सेवा केंद्र देखील चालवले आहे. गेल्या वीस वर्षांपासून त्यांनी वेगवेगळ्या जातीच्या द्राक्षांची शेती केली आहे. आपल्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी 2012 पासून द्राक्षाची नवीन जात शोधण्यासाठी प्रयत्न केलेत. अखेर 2018 मध्ये त्यांना द्राक्षाची नवीन जात शोधण्यात यश आले.
हे पण वाचा :- कौतुकास्पद! शारीरिक अपंगत्व असतानाही शेतीमध्ये केला नवखा प्रयोग; एका एकरात ‘या’ जातीच्या टरबूज पिकातून…
यानंतर त्यांनी आपल्या तीन एकर शेत जमिनीत या वाणाची लागवड केली. यातून त्यांना चांगले उत्पादन मिळाले असून या द्राक्षाची चव इतर जातीच्या तुलनेत चांगली असल्याने बाजारात मागणी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे त्यांना मिळालेले हे यश पाहून इतर द्राक्ष बागायतदारांनी देखील या जातीच्या लागवडीस पसंती दर्शवली आहे.
या नवीन वाणाच्या जातीपासून तयार होणारे द्राक्ष अधिक लांब आणि फुगवण चांगली असते. या द्राक्षाच्या फळाची साल पातळ असते. या जातीचे द्राक्ष कुज रोगाला प्रतिकारक असून इतर रोगही कमी प्रमाणात येतात. निश्चितच एका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याने शोधलेली ही जात द्राक्ष बागायतदारांसाठी फायदेशीर राहणार आहे.
हे पण वाचा :- महाराष्ट्रातील ‘त्या’ 15 जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडणार ! भारतीय हवामान विभागाचा इशारा