Havaman Andaj 2024 : भारतीय हवामान खात्याने दीपोत्सवाच्या काळात महाराष्ट्रात पाऊस पडणार अंदाज दिला होता. यानुसार दिवाळीच्या काळात राज्यातील काही भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे.
दिवाळीत राज्यातील काही भागात अक्षरशः ढगफुटी सारखा पाऊस झाला. मात्र आता गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोरडे आहे.
राज्यात मागील ३ दिवसांपासून पावसाने उघडीप दिलीये. दरम्यान, पुढील ५ दिवस राज्यातील हवामान कसे असणार, महाराष्ट्रात पुन्हा पाऊस सक्रिय होणार का? याबाबत हवामान खात्याकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
कसे असणार पुढील पाच दिवसाचे हवामान
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. या काळात पावसाची उघडीप राहील.
खरे तर दक्षिण भारतात ईशान्य मान्सून सक्रिय असून यामुळे दक्षिणेकडील राज्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान दक्षिणेकडील राज्यांमध्ये सुरू असणाऱ्या या पावसाचा महाराष्ट्रावरही काही विपरीत परिणाम होणार का असा प्रश्न होता.
मात्र भारतीय हवामान खात्याने पुढील पाच दिवस राज्यातील हवामान कोरडे राहील असे म्हटले आहे. अर्थातच दक्षिणेकडे सुरू असणाऱ्या या पावसाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार नाही हे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्रात मागील तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात शेती कामांना वेग आला आहे. रब्बी हंगामातील गहू हरभरा या पिकांच्या पेरणीसाठी सध्या पोषक परिस्थिती तयार असून पावसाच्या उघडीपीमुळे पेरणीच्या कामांना पुन्हा गती मिळाली आहे.
आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे गेल्या तीन दिवसांमध्ये राज्यात एक दोन ठिकाणी किरकोळ पावसाची नोंद वगळता पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमधील तापमान सध्या कमी झाले आहे. राज्याच्या किमान आणि कमाल तापमानात घट होत आहे.
यामुळे आता सकाळी सकाळी गारठा जाणवत असून थंडीची चाहूल लागत आहे. येत्या काही दिवसांनी आता राज्यातील थंडीची तीव्रता आणखी वाढणार आहे. दरवर्षी दिवाळीच्या काळात थंडीची तीव्रता वाढत असते यंदा मात्र दिवाळी उलटूनही थंडीची म्हणावी तशी तीव्रता पाहायला मिळालेली नाही.
पण आता राज्यात कडाक्याच्या थंडीला सुरुवात होणार आहे. कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली की शेती पिकांना याचा फायदा होईल, असे मत कृषी क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.