Havaman Andaj 2024 : येत्या काही दिवसांनी सप्टेंबर महिन्याची सांगता होणार आहे. यामुळे साऱ्यांचे लक्ष लागले आहे ते मान्सूनच्या परतीच्या प्रवासाकडे. खरंतर राज्यात सप्टेंबरची सुरुवात जोरदार पावसाने झाली होती. एक सप्टेंबर ते 3 सप्टेंबर दरम्यान राज्यात चांगला पाऊस झाला होता. काही ठिकाणी पूरस्थिती तयार झाली होती. अवघ्या दोन-तीन दिवसाच्या काळातच राज्यात पावसाने दाणाफान उडवली होती.
मात्र तदनंतर पावसाचा जोर कमी झाला. गणेशोत्सवाच्या काळात देखील यंदा फारसा पाऊस झाला नाही. गणरायाच्या आगमनाच्या दिवशी आणि तदनंतर दोन दिवस राज्यात केवळ हलका पाऊस झाला. दरम्यान, आता भारतीय हवामान खात्याने आजपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे.
महत्वाचे म्हणजे राज्यात परतीचा पाऊस मनसोक्त बरसणार आहे. आज पश्चिम राजस्थान आणि कच्छमधून परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे. दरम्यान राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आजपासून पुढील काही दिवस राज्यात चांगला जोरदार पाऊस होणार आहे. आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे आज राजधानी मुंबईसह, ठाणे, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज आहे.
तसेच नाशिक, जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांत सुद्धा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने मराठवाड्यात देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांना मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, जालना, बीड, नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. अर्थातच मराठवाड्यातील सर्वच्या सर्व म्हणजे आठ जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातही पावसाची शक्यता आहे.
विदर्भातील पूर्व, पश्चिम आणि मध्य भागातील जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने 10 ऑक्टोबर पर्यंत राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. महत्वाचे म्हणजे दक्षिणेकडील जिल्ह्यामध्ये दहा तारखे नंतर सुद्धा पाऊस पडत राहणार असा अंदाज आहे.