Havaman Andaj : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी आणि सुखद बातमी समोर आली आहे. ती म्हणजे बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या संभाव्य चक्रीवादळाचा आपल्या महाराष्ट्राला धोका नसल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून उद्या हे क्षेत्र चक्रीवादळात रूपांतरित होणार आहे.
हे कमी दाबाचे क्षेत्र थायलंडच्या पश्चिम किनाऱ्यावरील समुद्रात आहे. तथापि या चक्रीवादळाचा आपल्या भारताला फटका बसणार आहे. ओडिशा व पश्चिम बंगालच्या किनाऱ्याकडे हे चक्रीवादळ येणार अशी माहिती हवामान खात्यातील तज्ञांनी दिली आहे.
जमिनीवर आल्यानंतर ही वादळी प्रणाली अर्थात चक्रीवादळ पुढे बांगलादेश कडे रवाना होण्याची शक्यता आहे. पण, या चक्रीवादळाचा आपल्या महाराष्ट्रावर कोणताही विपरीत परिणाम होणार नसल्याची माहिती तज्ञांनी दिली आहे.
यामुळे शेतकऱ्यांनी आणि सर्वसामान्यांनी या चक्रीवादळाची भीती बाळगू नये. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्राला कोणताच धोका नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. मात्र, पुढील दोन दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सध्या जशी पावसाची तीव्रता आहे तशीच तीव्रता पुढील दोन दिवस कायम राहणार आहे. काल राज्यातील नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. गेल्या पाच दिवसांपासून दिवसा कडक ऊन आणि सायंकाळी तसेच रात्रीच्या दरम्यान जोरदार पाऊस असे वातावरण अनुभवायला मिळत आहे.
दरम्यान हीच परिस्थिती पुढील दोन दिवस म्हणजेच आज आणि उद्या अनुभवायला मिळणार आहे. परंतु 23 तारखे नंतर पावसाची तीव्रता कमी होणार आहे. 23 तारखेला राज्यात किरकोळ स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. यानंतर 24 तारखेपासून एक नोव्हेंबर पर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडीप राहणार आहे.
24 ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर पर्यंत राज्यातील खानदेशातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये, नाशिक, अहिल्यानगरसह मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागात, मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, तसेच विदर्भ विभागातील वाशीम, अमरावती, बुलडाणा, अकोला, नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांमध्ये या काळात पाऊस उघडीप देणार आहे.
सध्या देशात ईशान्य मोसमी पाऊस सक्रिय आहे. हा ईशान्य मानसून दक्षिणेकडील राज्यांमध्ये सक्रिय असतो आणि दक्षिणेकडे या काळात जोरदार स्वरूपाचा पाऊस होत असतो. सध्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये ईशान्य मान्सून सक्रिय असून तेथे जोरदार पाऊस होत आहे. परंतु या ईशान्य मान्सूनमुळे राज्यातही पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार आहे.
याचा परिणाम म्हणून 26 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर दरम्यानच्या चार दिवसांत विदर्भ विभागातील यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, मराठवाडा विभागातील हिंगोली, परभणी, नांदेड, धाराशिव, मध्य महाराष्ट्र विभागातील सांगली, सोलापूर व कोल्हापूर भागात ढगाळ हवामानासह किरकोळ स्वरूपाचा पाऊस होणार आहे. तदनंतर पाऊस थांबेल. म्हणजे यंदा दिवाळीत पाऊस पडणार नाही असे दिसते.