Havaman Andaj : गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यात पावसाला सुरुवात झाली असून कालपासून महाराष्ट्रातील पावसाची तीव्रता आणखी वाढली आहे. सुरुवातीला भारतीय हवामान खात्याने पावसाची तीव्रता एवढी राहणार नसल्याचे म्हटले होते मात्र अचानक हवामानात झालेल्या बदलामुळे पावसाचा जोर वाढला आहे. काल मराठवाडा आणि विदर्भ विभागातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला आहे.
यामुळे मराठवाडा आणि विदर्भ विभागातील काही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र विभागात देखील पावसाची तीव्रता वाढलेली आहे. अहमदनगर, नाशिक सहित खानदेशातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. अशातच, भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या सुद्धा महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार असा अंदाज आयएमडीने दिला असून या अनुषंगाने राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याकडून ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान आता आपण भारतीय हवामान खात्याचा हवामान अंदाज थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या जिल्ह्यांमध्ये बरसणार पाऊस
आज, गुरुवारी पालघर, नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये काही भागात अतिवृष्टी सारखा पाऊस होऊ शकतो अशी भीती आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.
म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन जाणकारांनी केले आहे. तसेच, ठाणे, मुंबई, रायगड, धुळे, नंदुरबार, पुणे जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग, जळगाव, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वारा आणि विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा पिवळा इशारा देण्यात आला आहे.
उर्वरित राज्यात मात्र हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच, भारतीय हवामान खात्याने उद्या अर्थातच शुक्रवारी सुद्धा पालघर, नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज या दोन्ही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे मात्र उद्या या दोन्ही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट मिळाला आहे.
तसेच राज्यातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, पुणे, सातारा, अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात विजा, वारे आणि ढगांच्या गडगडटासह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र उर्वरित राज्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागेल असा अंदाज आहे.