Havaman Andaj : भारतीय हवामान खात्याने नुकताच एक नवीन हवामान अंदाज जारी केला आहे. यामध्ये हवामान खात्याने राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज जारी केला आहे. खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पाऊस झाला होता.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका दक्षिण भारतातील तामिळनाडू आणि पुदुच्चेरी तसेच कर्नाटक राज्याला बसला. मात्र कर्नाटक आणि तामिळनाडू मध्ये झालेल्या पावसाचा प्रभाव आपल्या महाराष्ट्रातही पाहायला मिळाला.
त्यावेळी महाराष्ट्रात देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. दरम्यान आता पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे वेधशाळेने उद्यापासून महाराष्ट्रात उकळी पाऊस सुरू होणार असा अंदाज वर्तवला आहे.
वेधशाळेने वर्तवलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार राज्यात १९ अन २० डिसेंबर रोजी दक्षिण कोकणात आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात हे दोन दिवस तुरळक पाऊस पडणार असा अंदाज आहे.
तसेच, २० डिसेंबर रोजी मध्य महाराष्ट्रातील सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे, वेधशाळेने आपल्या नव्या अंदाजात म्हटले आहे.
पुणे जिल्ह्या बाबत बोलायचं झालं तर पुणे परिसरात आणखी काही तास आकाश निरभ्र राहून धुके पडण्याची शक्यता आहे. पण उद्या पुण्यातील हवामान बिघडणार आहे. १९, २० डिसेंबरला पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात ढगाळ हवामान होईल असा अंदाज पुणे वेधशाळेकडून वर्तवण्यात आला असून यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. अवकाळी पावसामुळे आणि ढगाळ हवामानामुळे रब्बी हंगामातील पिकांचे आणि कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.
फळबागांना देखील या अवकाळी पावसाचा फटका बसू शकतो. यामुळे अवकाळी पावसाचा आणि ढगाळ हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच शेतकऱ्यांनी आपल्या शेतीकामांचे नियोजन करावे असा सल्ला यावेळी जाणकारांनी दिला आहे.